Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा पालिकेच्या स्वच्छता दूतांनी पटकावला ' सर्वोच्च ' पुरस्कार

विटा : शिवदर्शन काॅम्पलेक्स परिसरातील सौ. कौशल्या जाधव, सौ. शितल मोहिते, सौ. कांचन गवळी, सौ. लोचना गवळी यांनी स्वच्छता कर्मचार्यांसोबत भाऊबीज साजरी करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. 

विटा (प्रतिनिधी)

विटा नगरपरिषदेने स्वच्छता अभियानात राज्यात आणि देशात अव्वल कामगिरी केल्यामुळे मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी पालिकेला सन्मानित केले आहे. मात्र यापेक्षा देखील मोठा पुरस्कार आज स्वच्छता कर्मचार्यांनी पटकावला आहे. कोरोनाच्या महामारीत एकही दिवस न चुकता नियमित कचरा उठाव करणार्या नगर परिषदेच्या कर्मचार्यांना ' बंधुराजाचा ' बहुमान देत खानापूर रस्त्यावरील महिलांनी त्यांचा अनोखा सन्मान केला. महिलांनी केलेला हा सन्मान हाच आम्हाला मिळालेला सर्वांत मोठा पुरस्कार आहे, आशा भावना या स्वच्छता दुतांनी व्यक्त केल्या.

विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील आणि स्वच्छतेचे ब्रँड अॅम्बिसिडर माजी नगराध्यक्ष अॅड वैभव पाटील यांनी गेल्या काही वर्षात स्वच्छता अभियानात कमालीचे सातत्य राखत देशपातळीवर उज्ज्वल यश मिळवले आहे. त्यामुळे विटा शहरात स्वच्छता हा केवळ शासकीय उपक्रम न राहता लोकचळवळ बनली आहे. कचरा जमा करणार्या घंटागाडीवरील कर्मचार्यांना शहरात सन्मानाची वागणूक दिली जाते. वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांचा आजपर्यंत गौरव करण्यात आला आहे. पालिकेने देखील राज्यात आणि देशात स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत आपला ठसा उमटविला आहे.

आज दिपावली पाडवा आणि भाऊबिजेच्या निमित्ताने पालिकेच्या कर्मचार्यांचा आणि पालिकेच्या कार्याचा अनोखा सत्कार सोहळा संपन्न झाला. कोरोनाच्या महामारीत गेल्या सात आठ महिन्यात एकही दिवस न चुकता नियमित कचरा उठाव करणार्या नगर परिषदेच्या कर्मचार्यांचा आज सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे खानापूर रस्त्यावरील शिवदर्शन काॅम्पलेक्स येथील महिलांनी या स्वच्छता दूतांचे भाऊबिजेनिमित्त औक्षण करुन त्यांच्या कामगिरीचा गौरव केला. या अनाहुतपणे झालेल्या सत्कार सोहळ्यामुळे या भाऊरायांना देखील गलबलून आले. आजपर्यंत आमचा अनेक ठिकाणी गौरव झाला, मात्र आम्हाला भाऊ मानून भाऊबिजेला झालेला हा सत्कार म्हणजे आमच्या कामाला मिळालेला सर्वोच्च पुरस्कार आहे, असे मत यावेळी कर्मचार्यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी सौ. कौशल्या जाधव, सौ. शितल मोहिते, सौ. कांचन गवळी, सौ. लोचना गवळी, सौ. जाधव वहिनी यांनी घंटागाडीवरील माणिक कांबळे, आरम आळतेकर, महेंद्र पोतदार या स्वच्छता कर्मचार्यांचे औक्षण करत त्यांच्यासोबत भाऊबिज साजरी केली. यावेळी शिवदर्शन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उत्तम नाना जाधव, विलास सुतार, सतिश भंडारे, सचिन मेहता, गणेश कदम आणि जगदीश निंबाळकर उपस्थित होते.
.................................

स्वच्छता हा ' संस्कार ' झाला...

विटा शहरात स्वच्छता हा केवळ उपक्रम न राहता तो अबालवृद्ध यांच्यावर संस्कार झाला आहे. स्वच्छता कर्मचारी ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता दिवस रात्र अथक परिश्रम करत आहेत. कोरोना च्या काळात देखील यात खंड पडला नाही. या स्वच्छता दुतांच्या कामाची दखल घेऊन महिलांनी त्यांच्यासोबत भाऊबिज साजरी करत त्यांच्या कामगिरीचा गौरव केला आहे. नागरिकांचा विश्वास संपादन करणे हे कर्मचारी आणि पालिका प्रशासनाचे मोठे यश आहे.

किरणभाऊ तारळेकर,
माजी उपनगराध्यक्ष, विटा.

Post a Comment

0 Comments