Daily Mahasatta

Daily Mahasatta

विरोधी नगरसेवकांशी ' समन्वय ' असल्याने ते तोंड देखील उघडत नाहीत ; वैभव पाटील यांची ' गुगली '

विटा : येथील पत्रकार परिषदेत बोलताना माजी नगराध्यक्ष वैभव पाटील. यावेळी किरण तारळेकर, अविनाश चोथे, प्रशांत कांबळे, फिरोज तांबोळी, अॅड सचिन जाधव, संजय सपकाळ, विनोद पाटील, सुभाष भिंगारदेवे, विकास जाधव.

विटा (प्रतिनिधी)
        ज्यांचे विटा शहरात मतदान नाही, ज्यांचा कोणताही संबंध नाही, त्यांनी विटा नगरपरिषदेच्या कामाविषयी काहीच बोलू नये, असा टोला माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी युवानेते सुहास बाबर यांना लगावला. तसेच आमचा विरोधी गटातील दोन्ही नगरसेवकांशी चांगला ' समन्वय ' असल्याने ते बिचारे तोंड देखील उघडत नाहीत, अशी गुगली देखील माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी टाकली.
         विटा शहरातील महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्याऐवजी डांबरीकरण करण्याची मागणी विटा नगरपरिषदेने केली आहे. याविषयी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी सत्ताधारी गट शहरातील विकासाला खोडा घालत असल्याची टीका केली होती. याबाबत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले, विटा शहरातील नागरिकांनी ५० वर्ष सातत्याने आमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे या विश्वासाला बांधील राहूनच आम्ही प्रत्येक पाऊल टाकतो. त्यामुळेच आज विटा शहर स्वच्छता अभियानात देशात चौथ्या स्थानी आहे. नाविन्यपूर्ण कामात पश्चिम भारतात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच मूलभूत सुविधा, वराहमुक्त, झोपडपट्टीमुक्त, अतिक्रमण मुक्त आणि उद्यमशील शहर म्हणून नावलौकिक कमावलाआहे. या कामगिरी मुळेच विटा शहरातील नागरिकांनी शंभर टक्के विश्वास दाखवत २०१६ च्या निवडणुकीत २४ पैकी २२ नगरसेवक आमच्या पार्टीचे निवडुण दिले तर विरोधकांना केवळ दोन जागांवर अत्यल्प मतांनी विजय मिळाला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देखील साडेचार हजार मतांनी निवडून आल्या आहेत. अर्थात विटा शहरातील नागरिकांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे.
        पाटील म्हणाले, विटा पालिकेने सुमारे ६५ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. यामध्ये खानापूर रोड हणमंत नगर ते चिरवळ ओढा आणि विवेकानंद नगर ते चिरवळ ओढा अशा पध्दतीने सर्व गटाराचे पाणी संकलित होणार आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्याची तोडफोड होणार आहे. त्यामुळे सद्या या परिसरातील काम काँक्रिटीकरणा ऐवजी डांबरीकरण करण्याची विनंती हाय वे अथाॅरिटीला केली होती. भुयारी गटारी चे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा रस्त्याचा हा भाग काँक्रिटीकरण करणे शक्य आहे. त्यामुळे कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे वैभव पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, अविनाश चोथे, प्रशांत कांबळे, फिरोज तांबोळी, अॅड सचिन जाधव, संजय सपकाळ, विनोद पाटील, सुभाष भिंगारदेवे, विकास जाधव उपस्थित होते.
..........................................

सुहास बाबर यांची
केविलवाणी धडपड


         विटा नगरपरिषदेची निवडणुक वर्षभरावर आली आहे. त्यामुळे सुहास बाबर यांनी आपले अस्तित्व दाखविण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू केली आहे. विटा शहरात तुमचे मतदान देखील नाही. त्यामुळे तुम्ही काहीच बोलू नका. उलट तुम्ही ज्या नागेवाडी गटाचे नेतृत्व करता त्या ठिकाणच्या घानवड ते नागेवाडी कारखान्यापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करा. लोक तुम्हाला दुवा देतील., असा टोला लगावला. तसेच विटा पालिकेत आमचा आणि विरोधी गटातील दोन्ही नगरसेवकांचा चांगला ' समन्वय ' आहे. त्यामुळे ते बिचारे एकही शब्द विचारत नाहीत, अशी गुगली देखील वैभव पाटील यांनी केला आहे .Post a Comment

0 Comments