Daily Mahasatta

Daily Mahasatta

देशात पुन्हा काँग्रेसचे सरकार येईल : महसूल मंत्री थोरात


सांगली : काँग्रेसच्या भव्य ट्रॅक्टर रॅलीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी राज्यमंत्री डाॅ विश्वजीत कदम, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते.

सांगली ( राजाराम पाटील)
        जनतेत भेदभाव करतो त्याचा पराभव निश्चित असतो, हे अमेरिकेतील निवडणुकीवरून दिसून येते
डोनाल्ड ट्रम्प यांनी जनतेत तेढ निर्माण केले त्याचा फटका त्यांना बसला. त्याच पद्धतीने केंद्रातील बीजेपी सरकारला फटका बसेल आणि पुन्हा देशात काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास महसूल मंत्री नाम. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
         केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज सांगली शहरात काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यातआली . सांगली बस स्टँड पासून सुरू झालेल्या रॅलीची सांगता नेमिनाथ मैदानावर झाली. यावेळी ट्रॅक्टर चालक, मालक, शेतकरी, व काँग्रेस नेते, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभेला संबोधित केले.
         दूध, साखर, कांदा, यांच्या संदर्भात चुकीची व्यापार नीती वापरून शेतकऱ्यांना नष्ट करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. आपले शत्रू राष्ट्र पाकिस्तान यांच्याकडूनही कांदा आयात केला जातो, म्हणजे काय? याचा अर्थ पाकिस्तान शत्रूपेक्षा शेतकरी मोठा शत्रू आहे असे केंद्रातल्या मोदी सरकारला वाटत आहे. अशी टिका महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
         मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कांद्याचे दर वाढले होते. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला असता. पण केंद्र सरकारने पाकिस्तान कडून कांदा आयात केला. दूध पावडर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र आणि देशात असताना मोदी सरकार दूध पावडर आयात करत आहे. तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात आहे. कोरोनामुळे दूध पावडर चा तुटवडा भासू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर दूध पावडर तयार केली असताना दुध पावडर आयात कशासाठी असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या बद्दल केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांबरोबर शहरी नागरिकांना ही धोक्याचे आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. या कायद्यामुळे साठे बाजारास परवानगी देण्यात आली. त्यामुळेच आता साठा करायचा आणि किंमती वाढवायच्या आणि नफा कमवायचा हा केंद्र सरकारचा डाव आहे. पण ते आम्ही करू देणार नाही. कारण शेतकरी संबंधी कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे. त्यामुळे पंजाब, हरियाणा प्रमाणे केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात राज्यात कायदे करण्याची आम्ही तयारी करत आहोत, असे थोरात यांनी स्पष्ट केले. त्यामुळे खासगी उद्योगांत भलं करणाऱ्या कायद्याविरोधात जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
         माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दोन ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये एक कोटी शेतकऱ्यांच्या सह्या घेण्याचे काम सुरू झाले आहे. कोणताही कायदा करताना तज्ञ, विरोधक यांच्याशी चर्चा न करता तडकाफडकी पंतप्रधान मोदी यांनी शेतीसंबधी कायदा केला. मोदी यांच्या कोणालाही विचारात न घेता काही नेते व अधिकाऱ्यांच्या मार्फत निर्णय घेण्याच्या सवयीवर त्यांनी निशाणा साधला. यावेळी त्यांनी अत्यावश्यक वस्तू कायदा, किमान हमी भाव कायदा, कंत्राटी शेती कायदा हे कायदे कसे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत हे सांगितले. साठ्यावर मर्यादा आणणाऱ्या अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या अटी शिथिल केल्या. व्यापारांना सुट दिली. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळतो त्या संस्था मोडीत काढण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. कंत्राटी शेती कायदा आणत आहे. त्यामुळे शेतकरी मूळ मालकच हा मजूर होईल. इत्यादी धोके त्यांनी व्यक्त केले. कायदेशीर व रस्त्यावरची लढाई दोन्ही मार्गाने मोदी सरकारचा हा शेतकरीविरोधी काळा कायदा मोडून काढण्याचा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
         मंंत्री डॉ. विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील, विशाल दादा पाटील, आम. विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. रॅलीसाठी सातशे ते आठशे ट्रॅक्टर आले होते. शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मदन भाऊ युवा मंच, विष्णू आण्णा, खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments