Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीच्या सुंदर नगर वेश्या वस्तीत रंगला भाऊबिजेचा भावनिक सोहळा

सांगली (प्रतिनिधी)

: सांगलीच्या सुंदर नगर वेश्या वस्तीत आज एक अनोखा भावनिक कार्यक्रम पाहायला मिळाला. अपघाताने वेश्या व्यवसायात अडकलेल्या वारांगना महिलांना आज हक्काचे भाऊ मिळाले आहेत. वेश्या वस्तीतच दिवाळी भाऊबीजेच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने या बंधू प्रेमाने वारांगना महिला मात्र चांगल्याच भारावून गेल्या. त्यामुळे कुटुंबापासून दूर असलो तरी भाऊबिजेच्या सण साजरा करता आल्याने वारांगना महिलांनी आभार मानले.

केवळ परिस्थितीमुळे या वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या वारांगना महिलांच्या आयुष्यात आज आनंदाचा दिवस आला. आज सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीतील वारांगना महिलांना आपली बहीण मानून ओवाळून घेण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. आज दीपावली भाऊबीजेच्या निमित्ताने सुंदरनगर वेश्या वस्तीत भाऊबीजेच्या अनोखा आणि हृदयस्पर्शी सोहळा रंगला. आणि या भाऊबीजेच्या कार्यक्रमामुळे अनेकांचे डोळेही पाणावले.

सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या प्रेरणादायी उपक्रमात सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, नगरसेवक अभिजित भोसले, अनारकली कुरणे, वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख, जमीर कुरणे यांनी उपस्थिती लावत या वारांगणांच्या भाऊबीजेच्या कार्यक्रमाची रंगत वाढविली. हा भाऊबीजेच्या उपक्रम समाजासाठी मार्गदर्शक ठरेल अशी प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या उपक्रमामध्ये सांगलीच्या सुंदरनगर मधील दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वारांगना महिलांना फराळ वाटप करून त्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन केले होते. 
वेश्या वस्तीत अनेक महिला या आपल्या कुटुंबापासून दूर असतात मात्र त्यांचे मन ओळखून त्यांनाही भाऊबीजेच्या उत्सव साजरा करता यावा यासाठी सांगलीत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments