Daily Mahasatta

Daily Mahasatta

आजी - माजी लोकप्रतिनिधी स्वार्थी राजकारण करत आहेत : मनसे नेते अविनाश जाधव

विटा ( मनोज देवकर )
          गदिमांच्या सारखा मोठा साहित्यिक इथे जन्मणे, हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. मात्र येथे एखाद्या साहित्यिकाचे स्मारक म्हणून ज्या काही गोष्टी असायला पाहिजेत त्या अजिबात नाहीत. इथले आजी माजी लोकप्रतिनिधी केवळ स्वार्थी राजकारण करत आहेत, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी केली.
         मनसेचे नेते व ठाणे पालघर चे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी खानापूर व आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली. राज्यसरकार बरोबर केंद्र सरकारने ही शेतकऱ्यांना मदत करावी असे मत त्यांनी विटा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी मनसे चे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, खानापूर तालुकाध्यक्ष साजिद आगा उपस्थित होते.
         कोरोना काळ व पाठोपाठ झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने मदत करावी. तसेच आम्ही इथली परिस्थिती राज ठाकरे यांच्या समोर मांडणार आहोत. शिवाय आम्ही मनसेच्या वतीने विविध नेते, पदाधिकारी राज्य भर पाहणी दौरे करून एक व्यापक अहवाल लवकरच तयार करू. राज ठाकरे स्वतः हा अहवाल सरकार पुढे सादर करतील.
          ग. दि. माडगूळकर स्मारकाच्या दुरावस्थेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरकारवर अविनाश जाधव यांनी टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र वाल्मिकी आणि महाकवि, थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मगावी शेटफळे (ता. आटपाडी) येथे भेट दिली. तेथील इमारतीची दुरावस्था पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, इथले लोकप्रतिनिधी काय करतात? वास्तविक पाहता गदिमांच्या सारखा मोठा साहित्यिक इथे जन्मणे, हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. मात्र येथे एखाद्या साहित्यिकाचे स्मारक म्हणून ज्या काही गोष्टी असायला पाहिजेत त्या अजिबात नाहीत. शिवाय इमारतीत फरशा, खिडकीच्या काचा फुटल्यात, इमारतीचे रंग उडलेत. अशी गोष्ट पुण्या-मुंबईकडे घडली असती तर सगळ्यांनी सळो कि पळो करून सोडले असते. पण येथे त्याचे कोणालाच काही पडलेले नाही. इथले आजी- माजी लोकप्रतिनिधी, निवडलेले आणि निवड झालेले सगळेच आपले स्वार्थी राजकारण करण्यात मग्न आहेत अशी टीकाही जाधव यांनी केली.

 

    

Post a Comment

0 Comments