Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

काही मंडळी अफवा पसरविण्याचे काम करत आहेत : आ. अनिलभाऊ बाबर

विटा ( प्रतिनिधी)
निवडणुक आली की काही मंडळी अफवा पसरविण्याचे काम करतात. १९९५ साली ऐन निवडणुकीत माझे आणि दाऊद चे संबंध असल्याची अफवा पसरविण्यात आली. आर. आर. आबा गृहमंत्री झाल्यानंतर मी त्यांना हा किस्सा सांगितला. जे बघायला मिळाले नाही ते मला भोगावे लागले, त्यामुळे किमान दाऊद ची भेट घडवा असे गंमतीने सांगितले. त्यावर आबा खळखळून हसले. आता देखील आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि जयंत आसगावकर यांचा जोमाने प्रचार करत आहोत. मात्र काही विघ्नसंतोषी मंडळी पुन्हा अफवा पसरविण्याचे काम करत आहेत. पण तुम्ही महाआघाडीचे काम जोमाने करा, असा आदेश आमदार अनिलभाऊ बाबर यांनी शिवसैनिकांना दिला.

महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ विटा येथील पंचफुला मंगल कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी कृषी राज्य मंत्री विश्वजीत कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड बाबासाहेब मुळीक, किरण लाड, जितेश कदम, नंदकुमार पाटील, नगरसेवक अमोल बाबर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर उपस्थित होते.

आ. बाबर म्हणाले, पदवीधरच्या मागच्या निवडणुकीत आम्ही रोष पत्करून अरुण लाड यांना मदत केली आहे. यावेळी देखील कोणाच्या सल्ल्यानुसार नव्हे तर अरुण आण्णांचे काम आम्ही सांगून सवरून करत आहोत. आमच्याकडे आतले आणि बाहेरचे असे काही नाही. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकसंघपणे अरुण लाड यांच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत.
अरुण अण्णा लाड हे पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कणखर भूमिका घेतील. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्र पक्षांचा तसेच रयत, स्वामी, भारती अशा शैक्षणिक संस्थाचा देखील पाठींबा आहे. त्यामुळे अरुण लाड आणि जयंत आसगावकर यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास आ. अनिलभाऊ बाबर यांनी व्यक्त केला.
----------------------------------------------
महाविकास आघाडी भक्कम
राज्यातील सरकार पाच वर्ष आपल्याला स्थिर राखायचे आहे. त्यामुळे नेते एकीकडे कार्यकर्ते दुसरीकडे असे चालणार नाही. आम्ही सर्वजण एकसंघ आहोत. अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी चुकीचे वागला तर आता काळ देखील माफ करणार नाही, असा सज्जड इशारा कृषी राज्य मंत्री विश्वजीत कदम यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.Post a comment

0 Comments