Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा पालिका निवडणुकीची ' रणधुमाळी ' ; सुहास बाबर यांचे संकेत

विटा ( प्रतिनिधी)
         विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षीय भेदभाव न करता विधानसभा निवडणुकीत आपल्या सोबत जे होते, त्यांच्या पाठीमागे प्रामाणिकपणे ताकद उभा केली जाईल. याबाबतची गोड बातमी दिवाळी नंतर देऊ असे सांगत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी विटा पालिकेच्या रणधुमाळीचे संकेत दिले. यावेळी माजी नगरसेवक अनिल म. बाबर, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक अमर शितोळे उपस्थित होते. 
          विटा शहरातील नेवरी नाका ते खानापूर नाका या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. परंतु पालिका प्रशासनाने भुयारी गटर योजनेचे कारण देत सदरचे काम काँक्रीटकरणा ऐवजी डांबरीकरण करावे, अशी मागणी केल्याची चार पत्रं बाबर यांनी पत्रकार बैठकीत दाखवली. विटा शहर हे दोन राष्ट्रीय महामार्ग आणि दोन राज्य मार्गावर येत असून भविष्यात खूप मोठे जंक्शन होणार आहे. त्यामुळे पालिकेने महामार्गाच्या कामात खोडा न घालता भुयारी गटारसाठी आवश्यक पाईपलाईन किंवा अन्य कामाचे नियोजन करुन शहरातील काँक्रिटीकरणाचे काम पुर्ण होण्यास सहकार्य करावे, अशी मागणी सुहास बाबर यांनी केली.

पक्षीय भेदभाव नाही...
          या बैठकीत भाजपचे माजी नगरसेवक अनिल म. बाबर, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, विद्यमान नगरसेवक अमर शितोळे उपस्थित होते. आगामी विटा पालिकेच्या निवडणुकी बाबत विचारले असता सुहास बाबर म्हणाले, राज्य पातळीवर काय होतय यापेक्षा विधानसभा निवडणुकीत आपल्या सोबत जे होते, त्यांनाच पक्षीय भेदभाव बाजूला ठेवून पूर्ण पाठींबा राहील असे सांगितले. त्यामुळे  माजी नगरसेवक अनिल म. बाबर, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक अमर शितोळे यांच्यासह विरोधकांची टीम एकसंघ पणे दिवाळी नंतर मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

        अर्थातच, विटा पालिकेच्या निवडणुकीला या महिन्यात चार वर्षे पूर्ण होत आहेत. विटा पालिकेच्या निवडणुकीसाठी केवळ १२ महिन्याचा कालावधी राहिल्यामुळे सत्ताधारी माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांचा गट स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हातात झाडू घेऊन मोर्चेबांधणी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. घराघरो पोहचून त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. तर दुसरीकडे युवा नेते सुहास बाबर यांनी अनिल म. बाबर, नंदकुमार पाटील, विद्यमान नगरसेवक अमर शितोळे यांच्यासह नव्या जुन्या सहकार्याना सोबत घेऊन पालिकेच्या मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीचा धुरळा दिवाळी नंतरच उडणार हे निश्चित.
..........................

ही तर नगरसेवकांची
ओळख परेड...


        स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विटा पालिकेच्या सत्ताधारी गटाने एकाच दिवशी बारा सभा घेतल्या. याबाबत विचारले असता सुहास बाबर म्हणाले, ही तर त्यांच्या नगरसेवकांची ओळख परेड आहे. गेल्या चार वर्षांपासून नगरसेवक कोण आहेत ? हेच जनतेला समजले नाही. त्यामुळे सत्ताधारी गटाने शहरात त्यांच्या नगरसेवकांची ओळख परेड सुरू केली आहे, अशी खरमरीत टीका सुहास बाबर यांनी केली.

Post a Comment

0 Comments