Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

भाजपाला जाब विचारण्याची हिच वेळ आहे : मंत्री डाॅ. विश्वजीत कदम

विटा ( मनोज देवकर  )

होणारी पदवीधर व शिक्षक मतदार संघाची विधान परिषदेचे निवडणूक ही भारतीय जनता पक्षाला जाब विचारण्याची वेळ आहे. सरकारने चुकीचे अनेक निर्णय घेतले. नोटाबंदी , चुकीच्या पद्धतीने जीएसटी ची अमंलबजावणी मुळे अर्थव्यवस्था वाईट अवस्थेला पोहचली. हजारो पदवीधर बेरोजगार झाले. भाजपाच्या चुकीच्या धोरणांचा त्रास शिक्षक व कर्मचाऱ्यांना सोसावा लागला. त्याचा जाब विचारण्याची ही वेळ आहे असे प्रतिपादन राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केले. पदवीधर चे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा मेळावा आमदार अनिल बाबर यांनी आयोजित केला होता. त्यावेळी मंत्री कदम बोलत होते.

महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. एकोणीस हजार कोटींची शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारने केली. कर्जमाफीच्या नावाखाली तत्कालीन सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा गैरवापर केला. शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अनेकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. राज्यात आर्थिक चणचण असताना सरकारने कोविड साथीच्या काळात आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे काम केले. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी दहा हजार कोटींचे पॅकेज दिले, असे कदम म्हणाले.

केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या हक्काचे अठरा हजार कोटी अजून दिलेले नाहीत. बिहारची निवडणूक डोळ्यासमोर असताना त्यांनी बिहार ला निधी दिला. केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप विश्वजीत कदम यांनी केला. व्हाट्सएपच्या फॉरवर्ड मेसेजेस वर विश्वास ठेवू नका. जर कुणी चुकीचं काम करत असेल तर काळ माफ करणार नाही. आतलं एक व बाहेरचं एक असे फार काळ लपून राहत नाही. असं कुणी काही केलं तर मतदार खपवून घेणार नाहीत असा इशारा ही स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांना दिला.

या वेळी बोलताना आमदार अनिल बाबर यांनी त्यांच्या भूमिकेविषयी होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. पदवीधरांच्या हाताला काम देण्याचे काम अरुण अण्णा यांनी केलं आहे. पूर्वीही आम्ही त्यांच्यासोबत होतो, आत्ताही आहोत. सुहास बाबर यांनी मागच्या निवडणुकीत अरुण लाड यांच्या पोलिंग एजंट चे काम केल्याची आठवण त्यांनी करून दिली. छोट्या मोठ्या अनेक शिक्षण संस्थांचा प्रा. जयंत आसगावकर यांना पाठींबा आहे. त्यामुळे दोघांचा विजय निश्चित असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली.

मतदानाच्या दोन तीन दिवस आधी अफवांचे पीक जोरात असते. राजकीय व्यक्तींना ही कुटुंब असते. त्यांनाही हृदय असते याचा विचार अफवा पसरवणाऱ्या लोकांनी करावा असे आवाहन त्यांनी केले. आम्ही सांगून वागतो. दिलेल्या शब्द मोडत नाही. कानात एक, मनात एक , तोंडात एक असे काम आम्ही करत नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळावे म्हणून ठामपणे काम करण्याचे आवाहन अनिल बाबर यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी चे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक , शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी मार्गदर्शन केले. मेघा गुळवणी , रवींद्र देशमुख , विजय पाटील , जितेश कदम , प्रताप शेठ साळुंखे , सुहास बाबर, अमोल बाबर श्रीकांत लाड , नंदकुमार पाटील व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सोशल डिस्टन्स चे पालन करण्यात आले.

Post a comment

0 Comments