Daily Mahasatta

Daily Mahasatta

अरुण अण्णांच्या विजयाचा मार्ग मोकळा, कोल्हापूरचे भैय्या माने माघार घेणार

सांगली ( प्रतिनिधी)

पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार अरुण लाड यांच्या पुढे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र आता भैय्या माने हे अर्ज माघारी घेऊन लाड यांना पाठिंबा देणार असल्याने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची भावना त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

अरुण लाड यांनी गतवेळी पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल करत लक्षवेधी कामगिरी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाचा दणका बसला होता. यावेळी मात्र राष्ट्रवादी नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदवीधर मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत विजय खेचून आणण्यासाठी अरुण लाड या उच्चशिक्षित आणि चारित्र्य संपन्न नेत्याला संधी दिली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली होती.

नुकतीच अरुण अण्णा लाड यांनी भैय्या माने यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. याबाबत माहिती देताना अरुण लाड म्हणाले, माझी आज प्रताप उर्फ भैय्या माने यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी भेट व चर्चा झाली. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार घोषित करण्यास विलंब झाला आणि पक्षाशी संवाद न होऊ शकल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामुळे आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असा खुलासा कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक, सिनेट सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या मानेंनी आमच्या झालेल्या चर्चेत केला.

भैय्या माने हे गेली कित्येक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत. प्रताप भैय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात नव्या पदवीधरांची नोंदणी करण्याचे मोठे काम केले आहे. प्रताप भैय्या यांनी आपली उमेदवारी मागे घेणार असून पक्षाच्या आदेशाप्रमाणे मला मदत करणार असल्याचे सूचित केले. पदवीधरांच्या आणखी बऱ्याच प्रश्नांवर आमची सकारात्मक चर्चा झाली. तसेच आमचे नेते जयंत पाटील साहेब व हसन मुश्रीफ साहेब यांचीही प्रताप भैय्या मानेंबरोबर सकारात्मक चर्चा झालेली आहे. प्रताप भैय्या निष्ठेने महाविकासआघाडीचेच काम करतील यात कोणतीही शंका नाही. प्रताप भैय्यांना आगामी काळात आमचे कायम सहकार्य राहील, असे मत लाड यांनी व्यक्त केले.
............................
अरुण लाड मोठ्या
फरकाने विजयी होतील...


प्रताप उर्फ भैय्या माने यांनी माघार घेतल्यावर अरुण लाड यांना मोठी ताकद मिळणार आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील भाजपच्या नेतेमंडळीनी लाड यांना मदत करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठी फिल्डींग लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अरुण लाड हे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी होतील, असा दावा लाड समर्थक करत आहेत. 

Post a Comment

0 Comments