Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

मुकादमाकडून सांगली जिल्ह्यातील ऊस वाहतूकदाराची १० लाखांची फसवणूक

कडेगाव ( सचिन मोहिते)
ऊसतोडीसाठी मजुर पुरवतो असे सांगून कडेगाव तालुक्यातील एका ऊस वाहतुकदार शेतकर्याची सुमारे १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राहुल भालचंद्र शिंदे रा. वडियेरायबाग, ता. कडेगाव असे फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार शेतकर्याचे नाव आहे.

राहूल शिंदे या शेतकर्याचे स्वमालकिचे ट्रॅक्टर असून त्यांनी क्रांती अग्रणी जे. डी. बापू लाड साखर कारखान्याचे ऊस वाहतुकीसाठी कंत्राट घेतले आहे. याकामी त्यांनी कारखान्याकडून १२ लाखांची उचल घेतली होती. त्यानंतर त्यांनी ऊसतोड मुकादम विजय महादेव उबाळे रा. साळुंखे वस्ती बामणी, मांजरी, जि. सोलापूर यांच्या सोबत ऊसतोड मजुर पुरवण्यासाठी करार केला. यावेळी ऊसतोड मुकादम विजय उबाळे यांने १४ कोयत्यांची जोडी देण्याचे मान्य केले व तसा लेखी करार करून दिला. त्यानंतर राहुल शिंदे यांनी मुकादम विजय उबाळे याला एन. ई. एफ. टी. द्वारे ९ लाख ८० हजार रुपये दिले.

क्रांती कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ होऊन पंधरा वीस दिवस उलटून गेले तरी मुकादम उबाळे यांने कराराप्रमाणे ऊसतोड मजुरांचा पुरवठा केला नाही. त्यामुळे राहुल शिंदे यांनी मुकादम विजय उबाळे यांच्या राहत्या घरी जावून चौकशी केली तर तो घरातून गायब असल्याचे समजले. मुकादम मजुर पुरवत नसल्याने तसेच तो फोन देखील उचलत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे राहुल शिंदे ( वडियेरायबाग ता. कडेगाव) यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी कडेगाव पोलीस ठाणे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली आहे.
-----------------------------------------------
पोलीस अधीक्षक
यांनी दखल घ्यावी ....

सातारा जिल्ह्यातील हिंगणी या गावातील ऊसतोड मुकादम कुबेर शिवाजी चव्हाण यांने खानापूर, कडेगाव आणि तासगाव तालुक्यातील चार ऊस वाहतूकदारांना सुमारे ३० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार १५ दिवसापूर्वी उघडकीस आला होता. त्यानंतर आता कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग येथील राहुल शिंदे या ऊस वाहतूकदारास १० लाखांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

Post a comment

0 Comments