Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

पुणे पदवीधर निवडणुक, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास गुन्हा दाखल होणार : जिल्हाधिकारी

सांगली, (प्रतिनिधी ) : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2020 साठी आचारसंहिता सुरू असून राजकीय सभा, मेळावे, कार्यक्रम घेत असताना कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात निवडणूक, कोरोना तसेच शाळा सुरू करण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधाकर तेलंग, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 87 हजार 223 तर शिक्षक मतदारसंघासाठी 6 हजार 812 मतदार आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 62 तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. सांगली जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 143 तर शिक्षक मतदारसंघासाठी 48 अशी एकूण 191 मतदार केंद्रे आहेत. पोस्टल मतपत्रिका छपाईचे काम पूर्ण झाले असून ज्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत अशांना त्या टपाली पाठविण्यात येत आहेत.

मतदाराचे नाव, मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदान केंद्र क्रमांक व मतदान केंद्राचे नाव आदीबाबतची माहिती देण्यासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून आवश्यक असल्यास मतदारांनी यावर संपर्क साधून माहिती घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही काटेकोर पालन करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावरील गर्दी टाळली जावी यासाठी एका मतदार केंद्रावर जास्तीत जास्त 700 मतदारांची यादी जोडण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल गन, मास्क, ग्लोव्हज, फेसशील्ड, पीपीई किट, सॅनिटायझर, व्हीलचेअर आदि साहित्य पुरविण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी 2 आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रे फवारणीव्दारे निर्जंतुकीकरण करून घेण्यात येतील.

निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता भंगाचा 1 गुन्हा दाखल असल्याचे सांगून ते म्हणाले, एसएसटी, एफएसटी, व्हीएसटी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कोरोनाबाबत सद्या जिल्ह्याचे चित्र आशादायक असल्याचे सांगून आवश्यक खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करून प्रत्येक शाळा प्रशासनाने शासनाच्या निर्देशांचे पालन करून शाळा सुरू कराव्यात. यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीने पुढाकार घ्यावा, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

8 हजार 456 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी तपासणी झालेल्यामधील 35 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पॉझिटीव्ह आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधाकर तेलंग यांनी दिली.
जिल्ह्यात आत्तापर्यंत 46 हजार 515 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले. त्यापैकी 44 हजार 447 रूग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्याचा रूग्ण कोरोनामुक्त होण्याचा रिकव्हरी रेट 95.55 इतका आहे. माहे सप्टेंबर 2020 मध्ये डब्लींग रेट 7 दिवस होता तो आता 741 दिवस इतका झाला आहे. सद्यस्थितीत 16 डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल सुरू आहेत तर 13 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू आहेत. तर ग्रामीण भागात 1 व महानगरपालिका क्षेत्रात 1 असे एकूण 2 कोविड केअर सेंटर सुरू आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्यास सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असून अनुषंगिक तयारी सुरू आहे. असे असले तरी जोपर्यंत सर्वांसाठी लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रतिबंध हाच उपाय आहे. हे लक्षात घेऊन लोकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वैयक्तिक स्वच्छतेचे सर्व नियम पाळावेत, मास्क वापरावा. स्वत:ची व आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेची काळजी अधिक संवेदनशिलपणे घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले.

00000

Post a comment

0 Comments