Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली सिव्हिलमध्ये ५०० खाटांच्या सुविधासह नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव पाठवा : मंत्री अमित देशमुख यांचा आदेश

मुंबई : वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. बैठकीला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते.

सांगली, (प्रतिनिधी )
येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयातील ५०० खाटांच्या सुविधांसह नवीन इमारत बांधण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी तातडीने पाठवण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. या बैठकीला काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव श्री. सौरभ विजय आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव श्री. जवंजाळ हे उपस्थित होते.

वसंतदादा पाटील सर्वोपचार रूग्णालयाची सध्याची दोनशे खाटांची इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. यापुढे तिचा वापर बंद होणार आहे. तसेच मिरज वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थी क्षमता 200 इतकी मंजूर झाली आहे त्यामुळे वाढीव तीनशे खाटांची आवश्यकता आहे. रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी 500 खाटांचे सर्व सोयींनी युक्त नवीन रुग्णालय बांधण्यात यावे असे निवेदन श्री पृथ्वीराज पाटील यांनी ना अमित देशमुख यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी ही बैठक घेतली होती.

सांगली आणि मिरज येथील सरकारी रुग्णालयांमधील नव्याने करावयाची कामे तसेच जुन्या इमारतींची दुरुस्ती याचा आढावा घेण्यात आला. या दोन्ही रुग्णालयांतील काही दुरुस्तीची कामे यासाठी ५ कोटी, 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सांगलीतील वसंतदादा रुग्णालयाच्या परिसरात दोनशे निवासी डॉक्टरांसाठी वस्तीगृह, नवे शवविच्छेदन गृह बांधणे तसेच नव्या ३०० खाटांसाठीच्या हॉस्पिटलकरिता अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासंबंधीचा प्रस्तावही पाठवण्यात यावा, असे ना. देशमुख यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.

सांगली आणि मिरज येथील दोन्ही शासकीय रूग्णालयांच्या विविध बांधकामांसाठी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात एकूण ५ कोटी, ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये वसंतदादा शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचे बांधकाम करणे तसेच मिरज वैद्यकीय महाविद्यालय येथील रक्त पेढीचे नूतनीकरण करणे तसेच ५ नवीन वार्डाचे बांधकाम करण्यासाठी एक कोटी, ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

याशिवाय वसंतदादा रुग्णालयातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३० लाख रुपये, येथील पाण्याची टाकी, वाहनतळ, अभ्यागत कक्ष, आवार भिंत इत्यादींच्या नव्याने करावयाच्या बांधकामासाठी ९० लाख रुपये मंजूर झाले आहेत. याच ठिकाणच्या सर्व इमारती आणि बाह्यरुग्ण विभाग येथील शौचालयांची दुरुस्ती तसेच नूतनीकरण यासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. येथील भूमिगत मलनि:स्सारण पाइपलाइनच्या दुरूस्तीसाठी ६० लाख रुपये तसेच सर्व इमारतींच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

या कामी पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील साहेब आणि कृषी व सहकार राज्यमंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम यांचे सहकार्य लाभले असल्याचे श्री. पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. बैठकीला व्हीसीद्वारे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नणंदकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजीराव माने, कार्यकारी अभियंता संतोष रोकडे उपस्थित होते.
---------

Post a comment

0 Comments