Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ नाका - इस्लामपूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा


पेठ (रियाज मुल्ला)
         पेठ नाका ते इस्लामपूर रस्ता साक्षात मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्यावरील असणारे भलेमोठे खड्डे, खचलेल्या साईड पट्ट्या यामध्ये आरणारी वाहने म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
       राष्ट्रीय महामार्गालगत असणारे पेठ गाव म्हणजे सर्व दिशांना जोडणारा एक केंद्रबिंदूच आहे. या ठिकाणाहून पुणे, बेंगलोर, शिराळा- रत्नागिरी व सांगली चा मार्ग पेठवरून जोडला जातो. मात्र इस्लामपूर रोड वरील पडलेल्या खड्ड्यांमुळे व खराब साईड पट्ट्यामुळे रोज वाहनांच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्यात खड्डा आहे की रस्ताच खड्ड्यांचा आहे हेच कळेनासे झाले आहे. हे खड्डे वाहनचालकांची जीवाशी खेळ करत आहेत.
        पेठ येथील मुख्य चौकात राजारामबापू बँक समोरील आणि इस्लामपूर रस्त्यावरील खड्डे यांचे प्रमाण जास्त वाढलेले असून याकडे लोकप्रतिनिधीचा कानाडोळा दिसून येतो. रात्रीच्या वेळी खड्डे चुकवताना वाहनधारकांची कसरत होत असून एक खड्डा चुकवायच्या नादात समोरील चार खड्ड्याना सामोरे जावे लागते. इतकी दयनीय अवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी तर या रस्त्यावरून प्रवास करून आल्यास गड जिंकून आल्याचा अविर्भाव निर्माण होतो. हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला असून खड्डे चुकवण्याच्या नादात याठिकाणी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे
       पेठ नाका हा सर्कल पॉईंट असून चार दिशांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. मात्र या ठिकाणच्या रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. पावसाळ्यात कंत्राटदार पोसण्यासाठी भरलेले खड्डे सुद्धा बाहेर आले आहेत. मध्यंतरी झालेल्या पावसाने पडलेल्या खड्ड्यात मुरूम सदृश्य माती टाकून तात्पुरते खड्डे बुजवण्याचे काम झाले मात्र झालेल्या पावसाने मुरूम सदृश्य माती वाहून गेल्याने परिस्थिती जैसे थे तशीच आहे. सद्यस्थितीत या मार्गावर भलेमोठे खड्डे पडले असून त्यात रस्ता शोधावा लागत आहे. तरी संबंधित खात्याने काही मोठी दुर्घटना होण्याअगोदर याकडे गांभीर्याने लक्ष घालून साईट पट्ट्या व खड्डे भरून घ्यावेत अशी मागणी प्रवासी वाहनधारकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments