Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाळवा तालुक्यात आज सुपर संडे, आज कोरोनाचा एकही नवीन रुग्ण नाही

 इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे)

वाळवा तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असून ही तालुक्यातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. गेले काही दिवस अर्धशतक, शतकाच्या दिशेने सुरू असलेला कोरोना ग्रस्तांचा आलेख आता खालावताना दिसत आहे. आज प्राप्त झालेल्या कोरोनाच्या तपासणी अहवालानुसार तालुक्यातील गावातून एकाही रुग्णाचा अहवाल पाॅझीटीव्ह आला नाही. कोरोनाग्रस्तांचा स्कोअर बोर्ड आज कोरा राहिला आहे. त्यामुळे वाळवे तालुक्यातील आजचा रविवार हा ' सुपर संडे ' ठरला. 

सुरवातीला  तालुक्यात इस्लामपूर मध्ये चार रुग्ण सापडले आणि इस्लामपूर शहराबरोबरच तालुक्यातील लोकांचे धाबे दणाणले. त्यानंतर शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत होता. सगळीकडे दहशतीचे वातावरण होते. कोरोना आता कोणत्या पातळीला जातोय याचीच चर्चा सगळीकडे होत होती. तालुक्यातील पॉझिटिव्ह अहवालाचा आलेख दररोज कमी जास्त होत होता. रुग्णांची संख्या केंव्हा कमी येणार ? तालुका पूर्णतः कोरोना मुक्त कधी होईल ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. आज दिवसभरात मात्र रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पूर्ण निगेटिव्ह आले आहेत. .
           
कोरोनाचे संकट जाऊन वाळवा तालुका कोरोना मुक्त केंव्हा होणार ? याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे किमान आजचा रविवार मात्र वाळवा तालुक्यासाठी समाधानकारक ठरला आहे. या सूपर संडे प्रमाणे वाळवे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कायमचा शून्यावर येऊन इस्लामपूर शहरासह तालुका लवकरच कोरोनामुक्त व्हावा अशा भावना नागरिकांच्यात व्यक्त करत आहेत. 

मात्र केंद्र सरकारने आता दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अद्याप सतर्क राहणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे नागरिकांनी किमान गर्दीच्या ठिकाणी, घरातून बाहेर जाताना काळजी घेऊन मास्क, सॅनिटायझरचा वापर करून शासनाच्या सूचनांचे पालन करून आपला गाव, जिल्हा,राज्य तसेच देश कोरोना मुक्त करण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करू शकू.

Post a Comment

0 Comments