Daily Mahasatta

Daily Mahasatta

रेशनचा मोठा काळा बाजार उघडकीस, महसूल विभागाची धडक कारवाई


: बिळुर येथून काळा बाजारासाठी जाणारा रेशनच्या गहू वाहतुकीचा टेम्पो पकडला, सुमारे ५० हजाराचा माल ताब्यात, एकावर गुन्हा दाखल

जत (सोमनिंग कोळी)
       जत तालुक्यातील बिळूर येथे महसूल विभागाने बुधवारी टाकलेल्या छाप्यात तब्बल पन्नास हजाराचे धान्य सापडले आहे. शासकीय रेशन दुकानातील धान्य असल्याची माहिती पुढे आली असून ते काळ्या बाजाराने कर्नाटक राज्यात विक्रिसाठी पाठवले जात होते. या प्रकरणी पोलिसात सहायक पुरवठा निरीक्षक यांनी फिर्याद दिली असून संशयित आरोपी महादेव कलप्पा कोळी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी धान्य आणि पिकअप  गाडी जप्त केली आहे.

         जतच्या बिळूर भागातून रेशनिंगचे धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांना मिळाली होती. त्या माहितीनुसार महसूल विभागाचे मंडल अधिकारी संदिप मोरे तलाठी रवी गाडी, पुरवठा विभागाचे रघुनाथ कोळी, उत्तम चव्हाण यांच्या पथकाने बिळूर येथील सुतार वस्ती येथे धाड टाकली.
       
        यावेळी पथकाला येथील कांबळे यांच्या शेतात एम. एच. १० जे. क्यू ६४०४ ही गाडी दिसून आली. या गाडीची तपासणी केली असता त्यात 50 किलो वजनाची गव्हाची 26 होती व 50 किलोची तांदळाची नऊ पोती मिळून आली. यामध्ये 26 रुपये किलोने गव्हाची किंमत 33800 हजार तर तांदळाची किंमत 13500 रुपये होत आहे एकूण 47 हजार 300 रुपयांचा हा माल आहे. महसूल विभागाने प्राथमिक केलेल्या तपासणीत हा माल रेशनिंगचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार महसूल व पुरवठा विभागाने आता या विभागातील रेशनिंग दुकानाची चौकशी सुरू केली असून या साखळीत कोण कोण सहभागी आहेत? याचाही शोध घेतला जात आहे.

        दरम्यान पुरवठा विभागाचे निरीक्षक रघुनाथ कोळी यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी महादेव कोळी याच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार हा गुन्हा दाखल केला आहे. तपास जत पोलिस करत आहेत. जतच्या दक्षिण भागातून शासकीय धान्याचा काळाबाजार वारंवार होत असल्याची चर्चा आहे. तसेच संशयित आरोपी हा धान्य गोळा करून तो कर्नाटकात विकत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments