Daily Mahasatta

Daily Mahasatta

आम्ही लष्कराच्या भाकरी भाजण्याचे काम बंद केले ; आम. सदाभाऊ खोत यांचा भाजपला घरचा आहेर


इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
आम्ही लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे काम आता बंद केले असून इथून पुढे येणाऱ्या सर्वच निवडणुका रयत क्रांती संघटना स्वबळावर लढणार असल्याचे मत आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. ते पुणे पदवीधर मतदार संघातून एन. डी. चौगुले यांचा अर्ज भरल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भीमराव माने, स्वरूप पाटील उपस्थित होते.

श्री खोत म्हणाले, " आमची बांधिलकी आपल्या माणसांशी, सामान्य जनतेशी, शेतकऱ्यांशी असून आता लढायचे ते त्यांच्यासाठीच. ही होणारी लढाई प्रस्थापीत विरुद्ध विस्थापित अशीच आहे. आजपर्यंत प्रस्थापितानी विस्थापिताना गुलाम बनवायचे काम केले आहे. म्हणूनच सामान्य कार्यकर्त्याला या निवडणुकीत उभा करण्याचा निर्णय घेतला. २० वर्षे पदवीधरांचे प्रश्न एन डी चौगुले यांनी सोडविण्याचे काम केले आहे. पदवीधर स्वतःच्या पायावर उभा राहावेत यासाठीच चौगुले यांना उमेदवारी दिली आहे. राजकारणात धनदांडगे, पै-पाहुणे, यांचीच जहागीरदरी झाली आहे. पदवीधर ची जागा ही विचारवंतांची आहे. पन्हाळा येथील कोतोलीत यासंदर्भात कार्यकर्ता मेळावा घेऊन प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. भविष्यात शेतकर्यांच्यासाठी असणाऱ्या सर्वच उद्योगात उतरणार आहोत की जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला आणि शेतकऱ्यांना न्याय देता येईल. 

आमची झोपडी हीच आमचा महाल आहे,कोणी आमच्या अंगावर यायला लागला तर त्यांचा महाल जाळण्याची ताकद आमच्याकडे आहे. लवकरच इस्लामपूर नगरपरिषद निवडणूक लागतील त्याही आम्ही योग्य उमेदवार देऊन स्वतंत्र लढवणार आहोत. शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी द्यावी. साखरेची आधारभूत किंमत केंद्र सरकारने वाढविली तर प्रति टनाला ३०० रुपये ३ रा हप्ता द्यावा. लवकरच रयत संघटना ऊस परिषद घेणार आहे. ही लढाई आजची नाही, गेली ३२ वर्षे शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. आम्ही फकीर आहोत गमावण्यासाठी आमच्याजवळ काहीच नाही."
एन. डी. चौगुले म्हणाले, " गेली २० वर्षे या क्षेत्रात काम करत आहे. आजपर्यंत पदवीधर, विद्यार्थी,शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. पदवीधरांचे प्रश्न मांडणार कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली आहे. राज्यात रयतेचा, शेतकऱ्यांचा नेता म्हणून सदभाऊंची ओळख आहे. त्यांनी कार्यकर्त्यांची उंची वाढविण्याचे काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे चांगले काम करू."
प्रवक्ते लालासाहेब पाटील, मा. सरपंच अतुल पाटील, विनायक जाधव, रामभाऊ सावंत, भाऊसो पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments