Daily Mahasatta

Daily Mahasatta

राजारामबापू कारखान्याने इथेनॉल निर्मिती मध्ये पुढाकार घ्यावा : मंत्री जयंत पाटील

इस्लामपूर : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिट मध्ये ऊसाची मोळी टाकून गळीत हंगाम शुभारंभ करताना ना. जयंतराव पाटील. समवेत पी. आर. पाटील, विजयबापू पाटील, प्रतिकदादा पाटील, संजय पाटील, आर. डी. माहुली, तसेच संचालक व मान्यवर.

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे)
        देशात अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखर कारखानदारी समोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने साखर उत्पादनासह इथेनॉल निर्मितीमध्ये देखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे जल संपदामंत्री व जिल्ह्याचे पालक मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी साखराळे येथील कार्यक्रमात केले.
        राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरुल शाखा, व कारंदवाडी युनिटमध्ये ना. पाटील यांच्या हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीमध्ये टाकून गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजयबापू पाटील, युवा नेते प्रतिकदादा पाटील, राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील,राजारामबापू सहकारी दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, सभापती सौ. शुभांगी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सौ. सुस्मिता जाधव यांच्या हस्ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
        मंत्री पाटील म्हणाले, देशात २५० लाख क्विंटल साखरेचा खप आहे. मात्र साखरेचे उत्पादन ३१० लाख क्विंटल होत आहे. ६० लाख क्विंटल अतिरिक्त उत्पादन होत असून गेल्या वर्षाची ११० लाख क्विंटल साखर शिल्लक आहे. त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच साखर निर्यातीचे पैसे अजून मिळाले नाहीत. आपण वाटेगावसह साखराळे युनिट मध्ये इथेनॉल निर्मितीवर भर द्यायला हवा. शेती विभागाचे कर्मचारी शेतात येवून उसाच्या नोंदी घेत असून शेतकऱ्यांना वर्षात ५-६ भेटी देवून मार्गदर्शन करणार आहेत. या वर्षात शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक सिंचन करण्यास प्रोत्साहन देणार आहोत. आपण यावर्षी २५ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप केल्यास, तसेच आपण करीत असलेल्या उपाय योजनांनी आपल्या संस्थेस आर्थिक सक्षमता येवू शकते. आपल्या कारखान्याच्या पाणी पुरवठा योजनांना वीज बिलाचा मोठा भुर्दंड बसत असल्याने ३२ मेगावट सौर उर्जा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात कर्नाटक सरकारशी चर्चा करीत जलाशय साठे निर्माण करणार आहोत. कोरोना ची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. कोरोनाच्या संकटात आपण अनेक जिवाभावाचे सहकारी गमावले आहेत.
        पी. आर. पाटील म्हणाले, आम्ही ऊस तोडणी मजुरांच्या विविध तपासण्या करून त्यांना मास्क,सॅनि टायझर, साबण मोफत देणार आहोत, तसेच कोरोना बाधितांच्यासाठी कोरोना सेंटर उभारणार आहोत. केंद्र सरकारने एफआरपीमध्ये वाढ केली,मात्र साखरेचे दर वाढविले नाहीत. केंद्र सरकारने सन २०१८-१९ ची एफआरपी देण्यास काढलेल्या बँक व्याजाच्या ५० टक्के रक्कम दिलेली नाही. केंद्राने आपले साखर निर्यात अनुदान ७३ कोटी ९२ लाख,व बफर स्टोक व्याजाचे ११ कोटी ७९ लाख रुपये अद्याप दिले नसल्याने आपला तिसरा हप्ता देण्यास विलंब झाला. आपण रुपये २०० दिले असून उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी निश्चितपणे देवू. आपण जतसह चार युनिटमध्ये २५ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार आहोत. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सर्वांनी सहकार्य करावे.
        यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील,उप नगराध्यक्ष दादासो पाटील, जि. प. चे माजी अध्यक्ष देवराज पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंत पाटील, महिलांच्या जिल्हाध्यक्षा सौ. छाया पाटील, माजी सभापती आनंदराव पाटील, भीमराव पाटील, सुभाष सूर्यवंशी, डॉ. एन. टी. घट्टे, संग्राम फडतरे, सुहास पाटील, सी. व्ही. पाटील, शामराव वाटेगावकर, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी आभार मानले. प्रसिध्दी अधिकारी विश्वनाथ पाटसुते यांनी आभार सूत्रसंचालन केले.
..................................
वारणेच्या डाव्या कालव्याचे
वाळवा तालुक्यास पाणी !!
वारणेच्या डाव्या कालव्याचे आडव्या पाटाने वाळवा तालुक्यास पाणी देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याचा आराखडा तयार केला असून १-२ महिन्यात त्याला अंतिम स्वरूप येवून राज्य सरकारची त्यास मान्यता मिळेल. यामुळे तालुक्याचा १०० वर्षाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. येत्या १०-२० वर्षात पाण्यावरून वाद निर्माण होवू शकतात,त्यापूर्वी आपल्या हक्काचे पाणी तालुक्यास मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे, असे ना. पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Post a Comment

0 Comments