Daily Mahasatta

Daily Mahasatta

संग्रामसिंह देशमुख सांगली जिल्ह्यातील ८० टक्के मतदान घेणार : मकरंद देशपांडे

: मकरंद देशपांडे यांचा विश्वास
सांगली (प्रतिनिधी)

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख हे जिल्ह्यात होणाऱ्या मतदानापैकी ८० टक्के मतदान घेतील असा ठाम विश्वास भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केला.

सांगली येथे आ. सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या मोजके नेते व कार्यकर्ते यांच्या महत्वाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश निवडणूक प्रमुख मा. सुनील कर्जतकर, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, भाजप शहर जिल्हा अध्यक्ष दिपकबाबा शिंदे, भाजपचे मनपातील नेते शेखर इनामदार, महापौर सौ. गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने, ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह भाजपचे नेते सुरेश आवटी, मुन्ना कुरणे, सौ. स्वाती शिंदे, सौ. भारती दिगडे, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे व पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना मकरंद देशपांडे म्हणाले कि, भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या रूपाने पक्षाने एक स्वच्छ चेहरा, अनुभवी व कार्यक्षम व्यक्ती, सहकार क्षेत्रातील तज्ञ व सर्वाना बरोबर घेऊन जाणाऱ्या तडफदार कार्यकर्त्यास संधी दिली आहे. संग्रामसिंह देशमुख यांनी अडीच वर्षे सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले असून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. एक कुशल प्रशासक म्हणून त्यांनी आपली ओळख या माध्यमातून निर्माण केली आहे.

देशपांडे यांनी पुढे सांगितले कि, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ असून एक अपवाद वगळता या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे. सांगली जिल्ह्यातील भाजपची वाढती ताकद लक्षात घेऊन पक्षाने यावेळी सांगली जिल्ह्याला उमेदवारी दिली असल्याने जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते यांची जबाबदारी वाढली आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि मनपातील नगरसेवक यांनी पूर्णपणे सक्रिय होऊन देशमुख यांच्या मोठ्या फरकाच्या विजयासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन देशपांडे यांनी केले.

तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही गाफील न राहता प्रत्येक मतरदारापर्यंत पोहचून त्याला मतदानासाठी आणणेपर्यंची जबाबदारी पार पाडली पाहिजे. हि निवडणूक अन्य निवडणुकांपेक्षा वेगळी असून ती जिद्दीने व चिकाटीने लढवावी लागते यासाठी त्याचे अतिशय विचारपूर्वक नियोजन करावे लागते. सांगली जिल्ह्यात भाजपची यंत्रणा सक्रिय झाली असून अतिशय योग्य नियोजन करून कार्यकर्ते कामास लागले असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
बैठकीत स्वागत व प्रास्ताविक शेखर इनामदार यांनी केले. तर पदवीधर मतदारसंघातील भाजपचा उमेदवार व निवडणुकीची रचना याबाबत जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे तसेच आ. सुरेश खाडे यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीचे अध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी यावेळी बोलताना सांगली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात भाजपच्या वाढत असलेल्या ताकदीचे कौतुक केले. तसेच जिल्ह्यातील बहुतेक सर्व सत्ताकेंद्रे पक्षाच्या ताब्यात असल्याने व उमेदवार या जिल्ह्यातील असल्याने याच जिल्ह्यातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल अशी खात्री व्यक्त केली. सांगली जिल्ह्यातील भाजपाचे वाढत असलेले काम हि सर्व कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख याना या जिल्ह्यात थांबण्याचीही आवश्यकता नाही इतका आत्मविश्वास येथील कार्यकर्त्यांमध्ये आहे व येथील स्थानिक नेते पूर्ण ताकद लावून पक्षाच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments