Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यातून पदवीधरसाठी तुल्यबळ लढत, महाविकास आघाडीकडून अरुण लाड मैदानात

सांगली (प्रतिनिधी )

पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अरुण लाड यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सांगली जिल्ह्यातूनच मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर जनता दलातर्फे माजी आमदार शरद पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. तसेच तासगाव तालुक्यातील प्रा. सोमनाथ साळुंखे हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अरुण लाड यांच्या नावाची घोषणा केली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करुन अरुण लाड यांच्या नावाची घोषणा केली आहे. आपल्या ट्वीट मध्ये जयंत पाटील यांनी म्हटले आहे, विधान परिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश चव्हाण तर पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड यांना महाविकास आघाडी कडून उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील , याचा आम्हाला विश्वास आहे, असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.

त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून सांगली जिल्ह्यातील उमेदवारातच तुल्यबळ लढत होणार आहे. प्रथमदर्शनी भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांच्यातच मुख्य लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पदवीधर मतदारसंघातील अनुभवी उमेदवार माजी आमदार शरद पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रा. सोमनाथ साळुंखे हे दोन्ही उमेदवार चमत्कार दाखवणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
......................................
ना. जयवंतराव आणि आ. चंद्रकातदादा
यांची प्रतिष्ठा पणाला लागणार...

पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे विजय खेचून आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार रस्सीखेच होणार हे निश्चित. 

Post a Comment

0 Comments