' यशवंत ' कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज

: गुरुवार १२ नोव्हेंबर रोजी गळीत हंगाम शुभारंभ : खासदार संजयकाका पाटील

विटा (प्रतिनिधी)
         खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील यशवंत साखर कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू करणार आहे. आगामी गळीत हंगामासाठी चार लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यासाठी काही यंत्रणेचे आधुनिकीकरण केले आहे. येत्या 12 नोव्हेंबर रोजी गळीत हंगामाचा शुभारंभ भागातील जेष्ठ शेतकर्‍यांच्या हस्ते करणार आहे. शेतकर्‍यांनी यशवंत कारखान्याला ऊस पाठवून भागाच्या विकासाला गती देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.

        यशवंत साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाची माहिती देण्यासाठी केमिस्ट भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी यशवंत कारखान्याचे जनरल मॅनेजर आर. डी. पाटील, जेष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये, डायमंड कल्चरल ग्रुपचे संस्थापक शंकरनाना मोहिते, महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सीलचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते.
        
        खासदार संजयकाका पाटील म्हणाले, यशवंत साखर कारखाना सुरू झाल्याने परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आपल्या डोक्यात नाही. येत्या गुरूवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता भागातील जेष्ठ शेतकर्‍यांच्या उपस्थितीत कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करणार आहे. गळीत हंगाम शुभारंभासाठी आमदार अनिलभाऊ बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव गायकवाड यांच्यासह सर्वांना निमंत्रित करणार आहे.
ते पुढे म्हणाले, टेंभू योजनेचे पाणी खानापूर, आटपाडी, खटाव भागात आले आहे. त्यामुळे या भागात ऊसाची लागवड वाढलेली आहे. गेल्या काही वर्षांत यशवंत कारखाना बंद असताना अनेक शेतकर्‍यांनी हा कारखाना सुरू करण्यासाठी आपल्याकडे मागणी केली होती. तासगाव साखर कारखाना सुरू करताना यशवंत कारखाना देखील त्या बरोबरीने सुरू करण्याचा आपला विचार होता. या विभागातील हा जुना साखर कारखाना आहे. हा सुरू करताना अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करीत आपण पुढे जात आहोत. कारखान्यात आवश्यक काम केले आहे. आधुनिकीकरण करून कारखान्याची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी गळीत हंगामासाठी चार लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याला किमान बाराची रिकव्हरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्याहीपेक्षा चांगले गाळप आणि रिकव्हरी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.

         ते पुढेे म्हणाले, शेतकर्‍यांच्या ऊसाला परिसरातील साखर कारखान्यांच्या तुलनेत बरोबरीने दर दिला जाईल. वजनकाट्याच्या बाबतीत यशवंत कारखान्याने यापूर्वीच नावलौकीक मिळवलेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी विश्वासाने साखर कारखान्याला ऊस द्यावा. या भागातील विकासाचे चाक पुन्हा रूळावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

Post a comment

0 Comments