हळदीच्या शेतात 52 लाखांचा गांजा जप्त

: हळदीच्या फडातील गांजाची शेती उध्दवस्त
: जत पोलीसांची कारवाई

जत ( सोमनिंग कोळी )
       जत पोलिसांनी तालुक्यातील सिंदूर या ठिकाणी एका शेतात छापा टाकून गांजा शेती उद्ध्वस्त केली आहे. यावेळी सुमारे 51 लाख 93 हजार 300 रुपये किंमतीची 520 किलो गांजाची झाडं जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी शेतमालकास अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या पथकाकडून सोमवार २ नोव्हेंबर ही कारवाई करण्यात आली आहे.

       सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील सिंदूर या ठिकाणी गांजाची शेती करण्यात आल्याची माहिती जत पोलिसाना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी सिंदूर या ठिकाणी बसप्पा कुसबा अक्कीवाड यांच्या शेतामध्ये छापा टाकला. यावेळी या शेतामध्ये हळदीच्या शेतीआड गांजाची शेती करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या शेतातील सर्व गांजाची झाडे उखडून टाकत जप्त केली आहेत. सुमारे 520 किलो हे गांजाची झाडं असून, त्यांची किंमत सुमारे 51 लाख 93 हजार 300 रुपये इतकी आहे.

 या गांजा शेती प्रकरणी बसप्पा कुसबा अक्कीवाड या शेतमालकास पोलिसांनी अटक केली आहे. जत तालुक्यातल्या पूर्व भागात अनेक ठिकाणी गांजा शेती करण्यात येत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. या महिन्यात ही दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या आठवड्यात सांगली स्थानिक गुन्हे शाखेने उमराणी येथे 17 लाख रुपयांचा गांजा जप्त करत कारवाई केली होती.1 नोव्हेंबर रोजी पूर्व भागातील जालिहाळ बुद्रुक येथे 70 हजार रुपयांचा गांजा जप्त उमदी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी या विरोधात वेळोवेळी कारवाई केली आहे. मात्र, तरीही जत तालुक्यामध्ये गांजाची शेती करणे हे सुरूच असल्याचे आज जत पोलिसांच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा समोर आले आहे.

Post a comment

0 Comments