Daily Mahasatta

Daily Mahasatta

खासगी सुतगिरणी संघटना अध्यक्षपदी आमदार संजयमामा शिंदे यांची निवड

आमदार संजयमामा शिंदे यांचा सत्कार करताना उपाध्यक्ष उल्हासराव सुर्यवंशी, किरण तारळेकर,  संजय जमदाडे, शामसुंदर मर्दा, भुषण म्हेत्रे,  संजय राठी, सुनिल कमते, आबासो कोटकर.
सांगली (प्रतिनिधी)
       महाराष्ट्र राज्यातील खासगी सुतगिरणी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची बैठक आज कुर्डुवाडी येथील विठ्ठल कार्पोरेशनच्या कार्यस्थळावर पार पडली. या बैठकीत आमदार संजयमामा शिंदे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
         यानिवड प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष व त्रिमुर्ती स्पिनर्सचे उल्हासराव सुर्यवंशी, विराज स्पिनर्सचे किरण तारळेकर, विठ्ठल कार्पोरेशनचे संजय जमदाडे, अरविंद ग्रुपचे शामसुंदर मर्दा, त्रिमुर्ती स्पिनर्सचे भुषण म्हेत्रे, लक्ष्मी काॅटस्पिनचे संजय राठी, औताडे स्पिनर्सचे सुनिल कमते, धनस्मृती स्पिनर्सचे आबासो कोटकर व इंडिया टेरीटाॅवेलससह अनेक सुतगिरणीचे प्रतिनिधी उपस्थिती होते.
     आमदार संजय शिंदे म्हणाले,  राज्यात १३० सहकारी सुत गिरण्या असुन त्यातील ६०/७० टक्केच्या आसपास सध्या उत्पादनाखाली आहेत. तर ९० ते ९५ खाजगी सुत गिरण्यामध्ये  सुमारे १९ लाख चात्या सुरु असुन त्यात जवळपास पांच हजार कोटी रुपयाची गुंतवणुक झालेली आहे. या खासगी सुतगिरण्या गेल्या चार वर्षापासुन वस्त्रोद्योगातील मंदी ,कापसाच्या दरातील चढउतार तसेच केंद्र व राज्य शासनाच्या काही चुकिचा धोरणांमुळे प्रचंड अार्थिक अडचणीत असुन बॅंकांची  कर्जे थकल्यामुळे यातील अनेक सुतगिरण्यांना लिलावाच्या कटु प्रक्रियेला सामोऱे जाणे भाग पडले आहे.
           या प्रतिकुल परिस्थितीत राज्य शासनाने सहकारी व खाजगी सुत गिरण्यांच्या सवलतीत भेदभाव केल्यामुळे खासगी सुतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. सन २०११ ला राज्य शासनाने कापसाच्या हिंसक तेजी मंदीच्या नुकसाणीपोटी फक्त सहकारी गिरण्यांना त्या कालातील सुत उत्पादनास प्रती किलो २०/- रु प्रमाणे करोडो रुपयांचे अनुदान दिले होते.,२०१७-१८ ला प्रति स्पिंडलला तीन हजार रुपयांचे साॅफ्ट लोन अर्थात व्याजमुक्त कर्ज दिले,२०१८ च्या वस्त्रोद्योग धोरणात सहकारी गिरण्यांना १ रु जादा वीजदर सवलत दिली व आता पुन्हा फक्त सहकारी गिरण्यांना गेल्या दोन वर्षातील कापुस खरेदीच्या १० टक्के कापुस अनुदान देण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे.
       सवलतीतील या भेदभावामुळे सहकारी व खाजगी सुत गिरण्यांच्या उत्पादन खर्चामध्ये जवळपास २५ रु प्रती किलोला फरक पडत असुन या असमान पातळीवरच्या स्पर्धेमुळे खाजगी सुत गिरण्या नुकसाणीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता खासगी सुतगिरणी संघटनेच्या माध्यमातून या प्रश्नावर शासन दरबारी आवाज उठवणार आहोत. लवकरच सहकारी आणि खासगी हा भेदभाव दूर करण्यात आम्हाला यश येईल असे मत आमदार संजय शिंदे यांनी व्यक्त केले.
.............................
अजितदादा यांच्या सोबत बैठक...
         आम. संजयमामा शिंदे यांनी खासगी सुतगिरण्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचेसोबत एका व्यापक बैठकीचे आयोजन  करु असे सांगितले आहे आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील खासगी सुतगिरणी चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी प्रयत्नशील राहणार आहोत.
          किरण तारळेकर
           संचालक ,
           खासगी सुतगिरणी संघटना, महाराष्ट्र 


 

Post a Comment

0 Comments