Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा शहरातील कोव्हीड सेंटर बंद

 

सांगली, प्रतिनिधी.)

       विटा शहरातील श्री सिद्धिविनायक कोव्हीड सेंटर आणि कवठेमंहकाळ येथील कोव्हीड हेल्थ सेंटर ( प्रायव्हेट) गुरुवार ता. २२ पासून बंद करण्यात आली आहेत. कोरोनाग्रस्तांच्या घटत्या रुग्ण संख्येनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
         कोविड हेल्थ सेंटर (प्रायव्हेट) कवठेमहांकाळ व श्री. सिध्दीविनायक कोविड केअर सेंटर विटा या रूग्णालयाच्या संचालकांनी त्यांची रूग्णालये सद्यस्थितीत रूग्णांअभावी चालू ठेवणे अशक्य असल्याबाबत कळविले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सदर रूग्णालयातील कोविड रूग्णसेवा दि. 22 ऑक्टोबर 2020 पासून बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
        सद्यस्थितीत कोविड रूग्णालय म्हणून कार्यरत असलेल्या ज्या रूग्णालयांत कोविड रूग्णांची संख्या अतिशय कमी किंवा शुन्य आहे अशा रूग्णालयांत सद्यस्थितीत नॉन कोविड रूग्णसेवेची आवश्यकता लक्षात घेऊन नॉन कोविड रूग्णसेवा कार्यान्वीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड रूग्ण सद्यस्थिती पाहता व संभाव्य कोविडच्या दुसऱ्या लाटेमधील रूग्णांची संख्या वाढल्याचे आढळल्यास रूग्णालय पुन:श्च कोविड रूग्णालय म्हणून कार्यान्वीत करण्यात येईल या अटीस अधिन राहून कोविड रूग्णसेवा बंद करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
         रूग्णालयाच्या फॅसिलीटी ॲपवरील सर्व माहिती अद्ययावत करण्यात यावी, प्रशासनाकडून व्हेंन्टिलेटर पुरवला असल्यास तो परत करावा, विहीत पध्दतीने रूग्णालयाची अंतर्गत व बाह्य स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणे करणे इत्यादी बाबींची पूर्तता करूनच कोविड रूग्णसेवा बंद करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.  या आदेशाचे उल्लंघन केल्यास अथवा सदर कामात हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments