Daily Mahasatta

Daily Mahasatta

विना मास्क फिरणाऱ्यांना दंडाच्या पावतीसोबत मोफत मास्क

सुरेश पाटील : अभिनव योजनेचा रविवारी शुभारंभ

सांगली (राजेंद्र काळे)
         : विनामास्क फिरणाऱ्यांना सध्या दोनशे रुपये दंड भरावा लागतो. दंड भरून तो तसाच विनामास्क पुढे जातो. यातून वादही होतात. यावर तोडगा म्हणून दंडाची रक्कम ५0 रुपये करून त्यासोबत मास्क मोफत देण्याची अभिनव योजना आम्ही महापालिका आयुक्तांकडे सादर केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून रविवारी याचा शुभारंभ पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती माजी महापौर व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.

       ते म्हणाले की, सध्या विनामास्क फिरणाऱ्यांकडून दोनशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. त्यावरून वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. अनेकजण दंड भरून तसेच विनामास्क फिरत राहून संसर्गाचा धोका वाढवत राहतात. यावर एक पर्याय म्हणून आम्ही एक प्रस्ताव दिला आहे. दंडाची रक्कम २00 वरून ५0 रुपये करावी व त्या पन्नास रुपये दंडाच्या पावतीसोबत संबंधितास मास्क मोफत द्यायचा. हे सर्व मास्क मिलेनियम होंडातर्फे आम्ही उपलब्ध करू. दंडाच्या जेवढ्या पावत्या फाटतील तेवढे मास्क संबंधितांना मोफत दिल जावेत. महापालिका क्षेत्रासाठी प्रायोगिक तत्वावर दहा दिवसांकरीता अशी योजना राबविण्यात येणार असून यामुळे उद्भवणारे वादाचे प्रसंग थांबून संसर्ग वाढण्याचा धोकाही थांबणार आहे. याबाबत आम्ही महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी या अभिनव योजनेस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते रविवारी योजनेचा शुभारंभ करण्यात येईल.

       पाटील म्हणाले की, दंड करण्यापेक्षा शिस्त लावणे व संसर्ग थांबविणे या गोष्टी महत्त्वाच्या असल्याने या उपक्रमातून चांगले परिणामही समोर येतील. प्रायोगिक तत्वावर दहा दिवसांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य संस्थाही पुढे येतील. हा एक सामाजिक उपक्रम असल्याने जिल्हा प्रशासनानेही याबाबतची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा आहे. सांगलीतून एक चांगला संदेश संपूर्ण राज्याला आपण या योजनेतून देऊ शकतो. स्वच्छता निरीक्षक किंवा दंडाचे अधिकार असलेल्या शासकीय कर्मचाºयांकडे आवश्यक तेवढे मास्क देण्याची आमची तयारी आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments