आम्ही टीका केल्यानंतर मुख्यमंत्री बाहेर पडले - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

सांगली ता.18
आम्ही वारंवार टीका केल्यानंतर मुख्यमंत्री आता घरा बाहेर पडत आहेत. याबद्दल त्याचे अभिनंदन, असा उपहासात्मक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. तसेच आपत्ती परिस्थिती फिल्डवर जाऊन निर्णय घ्यावे लागतात, अशी टीकाही पाटील यांनी केली.

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. सगळी जबाबदारी केंद्र सरकारकडे, मग तुम्ही काय करणार? असा खोचक सवाल पाटील यांनी केला आहे. तसेच मदत करण्याची पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे स्पष्ट करत तातडीने ती राज्य सरकारने जाहीर करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    राज्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांकडून नुकसान भरपाईच्या बाबतीत केंद्राकडे बोट दाखवलं जातंय. यावरून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्यात अतिवृष्टी झाली, त्यावेळी प्रभारी मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. त्यातही आमच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या तिजोरीतून दहा हजार कोटींची तातडीची मदत जाहीर केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने साडेसहा हजार कोटींची मदत दिली.

    अतिवृष्टी झाली, महापूर आला, वादळ आलं की फक्त केंद्राकडे बोट दाखवायचे. स्वतः मात्र काही मदत करायची नाही, मग तुम्ही करणार काय? असा खोचक सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. गेल्यावर्षी राष्ट्रपती राजवट लागू असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदतीची मागणी केली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यांनी ती मदत जाहीर करावी. कशाला पंचनामे करताय, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
 

Post a comment

0 Comments