Daily Mahasatta

Daily Mahasatta

गोपीचंद हे भविष्यातील ' गोपीनाथ मुंडे '

: ऊसतोड मजुरांना महाराष्ट्रात नवीन नेतृत्व

विटा  ( मनोज देवकर )
         आजपर्यंत  महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांचा नेता म्हंटले  की गोपीनाथ मुंडे यांचा चेहरा समोर येतो. भारतीय जनता पक्षाचे देशातील वजनदार नेते म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर भाजपाच्या माळी, धनगर आणि वंजारी या  ''माधव" समीकरणाला खीळ बसल्याचे चित्र आहे. भाजपातील बहुजन समजले जाणारे एकनाथ खडसे , राम शिंदे यांच्यासारखे नेते अंतर्गत राजकारणाचे बळी ठरले आहेत. विवादास्पद वक्तव्यांमुळे ते अधून मधून चर्चेत असतात. भाजपाच्या नेतृत्वाच्या फळीतील ही पोकळी भरून काढण्यासाठी नव्याने प्रवक्ते पदाची जबाबदारी गळ्यात पडलेले आम. गोपीचंद पडळकर सरसावल्याचे चित्र आहे.
           ऊसतोड मजूर , मुकादम , वाहतूकदार यांच्या विविध मागण्यांसाठी माजी मंत्री आमदार सुरेश धस यांच्या समवेत पडळकरांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. उसतोडणीच्या दरवाढी बाबतचा सन २०१९-२० ला करार संपुष्टात आलेला आहे.त्या अनुषंगाने ऊस तोडणी मजूर, मुकादम,वाहतूकदार संघटना, महाराष्ट्र राज्य व सर्व उसतोडणी संघटनांनी एकत्र येऊन हंगामी २०२०-२१ पासुन दरवाढीचा संप करण्याचे ठरवलेले आहे. या संदर्भात नवीन दरवाढीचा करार तसेच खालील मागण्या मान्य होईपर्यंत एकही उसतोड कामगार मजूर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी जाणार नाही, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.
       आमदार पडळकर यांनी शासनाकडे केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे...
1)उसतोडणी वाहतुकीच्या दरात 150% ने वाढ करावी.
2)मुकादमाच्या कमीशनमध्ये 18.5% ऐवजी 37% कमिशन करण्यात यावे.
3)शंभर टक्के शौचालय सुविधा असल्याशिवाय कारखान्याला गाळप परवाना देऊ नये.
4)कारखान्यांकडून उसतोड मजुरांचा तसेच बैलांचा विमा भरण्यात यावा.
5) कारखान्यावर उस तोड मजूर नेणे व आणण्याचा संपूर्ण खर्च कारखान्याने करावा.
6)उसतोडणी मजूर कारखाना साईटवर गेल्यावर क्वारंटाईन करु नये. तसे केल्यास त्या दिवसांची होणारी  नुकसान भरपाई कारखान्याने शंभर टक्के द्यावी.
7)उसतोडणी वाहतूक दरांचा होणारा करार तीन वर्षांचाच करण्यात यावा.
8)हंगाम 2014- 15 या हंगामातील 20% फरकाची रक्कम देणेत यावी.
9)मुकादमाच्या मजूराला दिलेल्या उचलीला कायद्याचे संरक्षण देण्यात यावे.
10)उसतोडणी मजूरांसाठी कामगार कायदा लागू करण्यात यावा.
11)राज्य सरकारच्या वतीने कोव्हीड - 19 उपचारासाठी प्रत्येक कारखान्यासाठी स्वतंत्र दवाखाना उभारण्यात यावा.
12)उसतोडणी मजूर व बैलांना मोफत उपचार मिळावेत.
13)शासनाने जिल्हाधिकार्यांच्या मार्फत उसतोड मजूरांची नोंदणी करावी.
           ऊसतोड मजूर आणि मुकादमाच्या मागण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शड्डू ठोकला आहे. एखादा विषय हाती घेतला की तो तडीस नेण्याचा पडळकर यांचा प्रयत्न असतो. मुंडे साहेबांच्या प्रमाणे गोपीचंद पडळकर यांची प्रभावी वक्तृत्व शैली आहे. अल्पावधीतच महाराष्ट्रातील बहुजन समाज त्यांच्या नेतृत्वाखालील संघटित होत आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बहुजन समाजाचा नेता म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर हे भविष्यकाळातील   गोपीनाथ मुंडे असल्याचा आशावाद लोकांतून व्यक्त होत आहे. 


 

Post a Comment

1 Comments