Daily Mahasatta

Daily Mahasatta

खानापूर तालुक्यात प्रशासनाकडूनच भर दिवसा वाळूची वाहतुक, पहा व्हायरल व्हिडिओ

विटा : महापुरामुळे नदीच्या पूलावर आलेली वाळू पुन्हा नदीपात्रात न टाकता प्रशासनाने ही वाळू ताब्यात घेऊन त्याची विटा येथे वाहतूक केल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

पहा वाळू वाहतूकीचा लाईव्ह व्हीडीओ

विटा (प्रतिनिधी)
        आंधळी - चिखलगोठण रस्त्यावर महापुरामुळे येरळा नदीवरील पूलावर वाळू भरली आहे. पुलावर आलेली ही वाळू पुन्हा नदीपात्रात टाकण्याऐवजी भाड्याने डंपर आणि जेसीबी मशीन आणून सदरची वाळू वाहतूक करुन विटयाला नेण्याचा ' उलटा उद्योग ' महसूल प्रशासनाने केला आहे.
      वाझर हद्दितील आंधळी - चिखलघोठण रस्त्यावरील पूलावर मोठ्याप्रमाणात वाळू साचली आहे. पुलावरून अजूनही पाणी वाहत आहे. जो भाग कोरडा झालेला आहे. त्या भागातील पुलावरील वाळूची आज शनिवारी जेसीपी व डंपरच्या साहाय्याने विटा प्रशासनाने वाहतूक सुरू केली आहे. खरे पाहता नदीच्या पुलावर आलेली वाळू पुन्हा नदीपात्रात ढकलणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने भाड्याने डंपर आणि जेसीबी मशिन सांगून वाळूची वाहतुक सुरू केली आहे. प्रशासनाने सुरु केलेल्या या वाळू उपशाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे.
         आंधळी येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही वाळू डंपरमध्ये भरून न नेता नदीपात्रातच ढकलून दिली असती तर पुलावरील रस्ता मोकळा झाला असता. वाळू चोरीचा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने संबंधित ठिकाणी चर काढावी किंवा कंपाउंड करावे जेणेकरून कोणतेही वाळूचोरी साठी मोठे वाहन नदीपात्रात येऊ नये अशी तरतूद प्रशासनाकडून करण्यात यावी व नदीपात्रातील वाळू उपसा थांबवा अशी आंधळी ग्रामस्थांकडून विनवणी करण्यात आली.परंतु केवळ संबंधित भागातील पोलीस पाटील यांनी दूरध्वनी माहिती देत पुलावरील कोरडी झालेली वाळू चोरीस जाण्याची शक्यता असल्याचे सांगितल्यामुळे प्रशासनाने ' तत्परता ' दाखवली.
       त्यानुसार तहसीलदार यांनी मंडलाधिकारी यांना पत्राद्वारे आदेश देण्यात आला की पुलावरील वाळू साठा सुरक्षित ठिकाणी हलवा जेणेकरून पुढील कारवाई करता येईल. या कारवाईचा पंचनामा करून सायंकाळी पाच वाजेपर्यंत तहसील कार्यालय येथे सादर करावा अन्यथा वाळू चोरी झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार असतील असा आदेश तहसीलदार यांनी दिला.
         वास्तविक पाहता नदीकाठी वाहून आलेली वाळू पुन्हा नदीपात्रात ढकलणे आवश्यक होते. वाळू चोरीला जाईल म्हणून डंपर, जेसीबी भाड्याने घेऊन वाळू शासकीय कार्यालयात घेऊन जाणे किती योग्य आहे? उद्या नदीपात्रातील वाळू चोरीला जाऊ लागल्यास प्रशासन हाच निकष लावणार आहे का ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
         याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी, प्रशासनाने नेमकी किती वाळू ताब्यात घेतली ? वाळू वाहतूकीचा खर्च कोणाच्या खिशातून होणार ? स्थानिक नागरिकांचा विरोध असताना केवळ पोलीस पाटील यांच्या फोन वरुन दिलेल्या माहितीच्या आधारे वाळू वाहतूक का करण्यात आली ? नदीपात्रातील वाळू पुन्हा पात्रात का टाकली नाही ? याची चौकशी करावी.


Post a Comment

0 Comments