Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड : वाघमोडेनगर मध्ये गटारीचे पाणी रस्त्यावर

महापालिकेचे दुर्लक्ष :नागरिकांच्या आरोग्यास धोका

कुपवाड ( प्रमोद अथणीकर )
         शहरातील वाघमोडेनगर येथे महापालिकेच्या दुर्लक्षितपणाच्या धोरणामुळे गटारीचे सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे वाघमोडेनगरमधील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेले कित्येक दिवस सुरू असलेला नागरिकांच्या आरोग्याशी खेळ महापालिकेने थांबवून हा सांडपाण्याचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
        वाघमोडेनगर भागात दोन हजारांहून अधिक लोकवस्ती आहे. या भागात गोरगरीब हमाल व कामगार मोठय़ा प्रमाणावर राहतात. या गोरगरीब नागरिकांना येण्या- जाण्यासाठी एकच रस्ता आहे. या रस्त्यावर महापालिकेच्या दुर्लक्षितपणाच्या धोरणामुळे गटारीचे सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे. नागरिकांना गेले कित्येक दिवसापासून हा प्रश्न भेडसावत आहे. सांडपाणी पसरलेल्या या रस्त्यावर नागरिकांना ये जा करण्यास मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. यामुळे नाााागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
         रस्त्यावर सोडलेल्या या सांडपाण्यामुळे या भागात रोगराई वाढली आहे. अगोदरच डेंग्यू व चिकन गुनिया आदी साथीच्या रोगाने कुपवाड परिसरात थैमान घातले आहे. त्यात भर म्हणून हे गटारीचे पाणी रस्त्यावर सोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसापूर्वी या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला होता. परंतु सांडपाणी असल्याने रस्त्याचे काम रखडले असल्याची माहिती मिळाली आहे. शहरातील लोकप्रतिनिधी व मनपा अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन या गटारीच्या सांडपाण्याचा प्रश्न त्वरीत निकालात काढावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments