Daily Mahasatta

Daily Mahasatta

गोपीचंद पडळकरांना डावलले, सुरेश धस यांना दरवाजावर रोखले!

सांगली ( मनोज देवकर )
        ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर बीड चे आमदार सुरेश धस आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी वातावरण तापवले होते. पण ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणामुळे पडळकर व धस यांनी तापवलेल्या ऊसतोड कामगारांच्या संपावर विरजण पडले गेल्याचे चित्र आहे.
         राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार , सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे , ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. या बैठकीत धस यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यांनी गेटवरच आंदोलन सुरू केले होते, त्यानंतर त्यांना बैठकीत प्रवेश देण्यात आला होता. 
आ. सुरेश धस आणि आ. गोपीचंद पडळकर हे गेले काही दिवस आक्रमकपणे या मजुरांचे प्रश्न मांडत होते. तसेच तोडगा निघाल्याशिवाय मजुरांना साखर कारखान्यावर जाऊ नये, असे आवाहन ते करत होते. तसेच मजुरी दरात शंभर टक्‍क्‍यांहून अधिक वाढीची आक्रमक मागणी त्यांनी केली होती. 
         आम्हाला बैठकीचा निरोप द्यायचा, सन्मानाने बोलवायचे आणि दारात येऊन थोबडीत हाणून माघारी निघा म्हणायचं, ही पद्धत आम्हाला आवडलेली नाही. आम्ही बीड जिल्हावाले आहोत. आम्ही संघर्षाला घाबरत नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे बीडचे आमदार सुरेश धस यांनी दिला. 
        ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला असून कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. साखर कारखान्यांशी दरवाढीसंदर्भातील तीन वर्षांचा करार करण्यात येईल. तसेच मुकादमांचे कमिशन १९ टक्के करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ऊसतोड कामगार संघटनांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून कामगार आता कारखान्यांवर रूजू होतील.
         या बैठकीदरम्यान स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाद्वारे ऊसतोड कामगारांच्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करण्यात आले. महामंडळ नोंदणी लवकर पूर्ण करून डिसेंबरपासून महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत निर्देश देण्यात आले.
        ऊसतोड कामगारांची नोंदणी, साखर कारखाने तसेच ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना, वैयक्तिक अर्थसहाय्य योजना, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे, भोजन योजना, कामगार महिलांसाठी आरोग्य योजना, कामगारांसाठी विमा योजना, यांसह विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
...........................
विविध योजना राबविणार...
''स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार आहे "- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  

Post a Comment

0 Comments