Daily Mahasatta

Daily Mahasatta

' बापूसाहेबांच्या ' आठवणीने महेंद्रआप्पा लाड गहिवरले

कुंडल ( श्रीकांत माने)
         प्रसंग होता स्व.बापूसाहेब येसुगडे ह्यांच्या शोकसभेतील. तालुका व परिसरातील अनेकविध क्षेत्रातील मान्यवर ह्या शोकसभेला अगत्यानं उपस्थित होते. प्रत्येक वक्त्याच्या श्रद्धांजलीपर भाषणातून त्यांचे बापूसाहेबांवरचे प्रेम दिसून येत होते. कुणी नातेसंबंधांवर बोलत होते, कुणी बापूंचं राजकीय कौशल्य विस्तारानं सांगत होते तर कुणी बापू येसुगडेंच्या स्वभावगुणवैशिष्ट्यांवर आपले शब्द खर्ची घालत होते.
          खा. संजयकाका व ना. डॉ. विश्वजित कदम साहेबांनंतर मी तालुक्याचे नेते मा. महेंद्रअप्पा लाड ह्यांना बोलण्याची विनंती केली. 'होय-नाही' म्हणत अप्पा माईकवर आले. इतर वेळी सहज-सुलभ भाषणांसाठी परिचित असणारे अप्पा व्यक्त होऊ लागले आणि ऐकणारे सर्वच स्तब्ध झाले. महाविद्यालयीन जीवनापासूनच अप्पा-बापूंची मैत्री तालुक्यानं अनुभवली आहे . उपजत नेतृत्त्वगुण असल्यानं दोघेही राजकारणासारख्या आव्हानात्मक क्षेत्रामध्ये आपलं योगदान देऊ लागले. महाराष्ट्राच्या राजकारणातील दूरदृष्टीचे व मुरब्बी नेते डॉ.पतंगराव कदम साहेबांच्या राजकीय तालमीत तयार झालेली ही जोडगोळी. 
        केवळ राजकीय डावपेच शिकवतील ते साहेब कसले ? संघटन , तत्परता व दातृत्व ह्यांबरोबरच एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होण्याची शिकवण डॉ.पतंगराव कदम साहेबांचीच. साहेबांच्या विचारांवर भक्ती व दिलेल्या शिकवणींवर कार्यरत असणारे महेंद्रअप्पा हे आपल्या मित्रांवर व कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करतात.
आंधळीचे सचिन , कुंडलचे एन. डी. गोरड ह्यांसारखे जीवाला जीव देणारे मित्र जेव्हा अर्ध्यात साथ सोडून गेले तेव्हा लहान मुलासारखं हमसून रडताना अप्पांना अनेकांनी पाहिलंय. 'राजकीय नेत्यानं खंबीर व कणखर असावं' हा आजकालच्या राजकारणाचा निकष. महेंद्रअप्पा खंबीर व कणखर तर आहेतच पण मृदू स्वभावाचे व भावनिकही आहेत. 'जीव लावावा तर जीवापाड लावावा' आणि म्हणूनच बापू येसुगडेंवरील प्रेम असेच जीवापाड , सुखदु:खांच्या पलीकडचा मैत्रभाव आणि मैत्रीच्या पलीकडचे भावबंध. ह्या सगळ्या भावना शब्दातून व्यक्त होत असताना अप्पांचा आवाज दबका झाला , शब्दांची जागा दीर्घ श्वासांनी घेतली , बापूंच्या आठवणी महेंद्रअप्पांच्या डोळ्यांतून पाझरु लागल्या आणि मित्राच्या आठवणीमुळे महेंद्र अप्पांना गहिवरून आले. आपल्या जीवनात मित्राची जागा काय असते हे महिंद्र आप्पांच्या अव्यक्त शब्दातून सर्वांना प्रकर्षाने जाणवले.

Post a Comment

0 Comments