Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली, विटा, इस्लामपूरात ' दंडाच्या पावतीसोबत ' मिळणार मोफत मास्क

' दंडासोबत मास्क ' या मिलेनियम होंडाच्या अनोख्या उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी  सुरेश पाटील, संजय बजाज, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने आदी उपस्थित होते.

सांगली ( राजेंद्र काळे)
         विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करतानाच त्यांना मास्क मोफत देण्याच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. त्यांच्याहस्ते रविवारी अभियानास प्रारंभ करण्यात आला.
      माजी महापौर व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही संकल्पना मांडली, त्यास महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रतिसाद दिला. महापालिका क्षेत्रासाठी या अभियानास रविवारपासून सुरुवात करण्यात आली. मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते महापालिका अधिकार्यांकडे मिलेनियम होंडातर्फे हे मोफत मास्क सुपूर्द करण्यात आले.
       उपक्रमाची माहिती देताना सुरेश पाटील म्हणाले की, सध्या विनामास्क फिरणार्यांकडून दोनशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. अनेकजण दंड भरून तसेच विनामास्क फिरत राहून संसगार्चा धोका वाढवत राहतात. यावर एक पर्याय म्हणून आम्ही एक प्रस्ताव दिला होता. दंडाची पावती फाडल्यानंतर त्यासोबत संबंधितास मास्क मोफत द्यायचा. हे सर्व मास्क मिलेनियम होंडातर्फे आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. दंडाच्या जेवढ्या पावत्या फाटतील तेवढे मास्क संबंधितांना मोफत दिल जाणार आहेत. महापालिका क्षेत्रासाठी प्रायोगिक तत्वावर दहा दिवसांकरीता ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे उद्भवणारे वादाचे व असुरक्षिततेचे प्रसंग थांबून संसर्ग वाढण्याचा धोका थांबणार आहे.
          याबाबत आम्ही महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या अभिनव योजनेस तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ही योजना लगेचच कार्यान्वित झाली. दंड करण्यापेक्षा शिस्त लावणे व संसर्ग थांबविणे या गोष्टी महत्त्वाच्या असल्याने या उपक्रमातून चांगले परिणामही समोर येतील. प्रायोगिक तत्वावर दहा दिवसांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य संस्थाही पुढे येतील. हा एक सामाजिक उपक्रम असल्याने जिल्हा प्रशासनानेही याबाबतची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा आहे.
..............................
शिस्त लावण्यासाठी उपक्रम महत्त्वाचा :
      जयंत पाटील म्हणाले की, अशाप्रकारचा उपक्रम सर्वत्र राबविणे गरजेचे आहे. बेशिस्त व गाफिल लोकांना शिस्त लावण्यासाठी या उपक्रमाचा निश्चित लाभ होईल.
................................
इस्लामपूर, विटा येथेही उपक्रम :
        सुरेश पाटील यांनी सांगितले की, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रासह इस्लामपूर, विटा याठिकाणीही उपक्रम राबविण्यात येईल. महापालिका क्षेत्रात स्वच्छता निरीक्षकांना तर विटा व इस्लामपुरात वाहतूक पोलिसांना मास्क वाटपासाठी देण्यात येतील. 


 

Post a Comment

0 Comments