Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडमध्ये शंभर घरात नाल्याचे पाणी घूसले

तुळजाईनगर : पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसल्यानंतर त्या भागाची उपायुक्त स्मृती पाटील यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक विष्णु माने, राजेंद्र कुंभार, अनिल पाटील उपस्थित होते.

कुपवाड (प्रमोद अथणीकर)
      शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील मंगलमूर्ती काॅलनी, चैत्रबन सोसायटी, तुळजाईनगर भागात नैसर्गिक नाल्यातील पावसाचे पाणी शंभरभर घरात शिरले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर नाल्याचे पाणी घराघरात शिरल्याने महिला वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या या परतीच्या पावसामुळे शहरातील जुन्या मातीच्या काही घरांची पडझड झाली आहे.
          कुपवाड एमआयडीसीतील चाकण ऑईल मिल पाठीमागील व सिध्दार्थ नगरजवळून येणारा नैसर्गिक नाला या दोन नाल्याचा संगम पुढे पाटील मळ्याजवळून आनंदनगर येथील नाल्यात झाला आहे. हा नाला पूर्वी ओढा या नावाने ओळखला जात होता. तो नाला सध्या अतिक्रमणामुळे लहान झाला आहे. त्यामुळेच मंगलमूर्ती काॅलनी, चैत्रबन सोसायटी, तुळजाईनगर भागात नैसर्गिक नाल्यातील पावसाचे पाणी शंभरभर घरात शिरले आहे.
        गेल्या दोन दिवसापासून पाऊस पडत आहे. बुधवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा प्रवाह मोठा होऊन पाणी नागरी वस्तीत शिरले आहे. मंगलमूर्ती काॅलनी तील काही घराला या पावसाच्या पाण्याने वेढा घातला आहे. घरात पाणी घुसलेल्या या भागात महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेवक विष्णू माने, नगरसेवक राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर आदींनी भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. महापालिका प्रशासनाने चरी पाडून काही ठिकाणी पाण्याचा निचरा केला आहे.
        ऐन नवरात्रीच्या सणाच्या तोंडावर ओढवलेल्या या संकटामुळे महिला वर्गाला त्रास सहन करावा लागला आहे. सध्या नवरात्रीच्या सणाची धामधूम सुरू असल्याने महिला वर्ग घराची स्वच्छता करण्यात मग्न आहेत. मात्र, या धामधूमीत झालेल्या पावसामुळे महिला वर्गाची तारांबळ उडालेली आहे. पावसामुळे सकाळी कुपवाड फाटा येथे नैसर्गिक नाल्याचे पाणी रस्त्यावर आले होते. शहरातील जुन्या मातीच्या काही घरांची पडझड झाली आहे. कुपवाड तलाठयांकडून या पडलेल्या घराचा पंचनामा करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments