कुपवाडच्या प्रणव अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजची मालमत्ता जप्त; ३५० कोटीचे कर्ज थकीत

: पोलीस बंदोबस्तात कारवाई

कुपवाड (प्रमोदअथणीकर )
          : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील प्रणव अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजची मालमत्ता  बुधवारी सायंकाळी  कॅनरा बँकेकडून सील करण्यात आली. या कारवाईत प्रणव अँग्रो इंडस्ट्रीजच्या इमारत, मशिनरीसह जंगम मालमत्तेचा ताबा बँकेकडून घेण्यात आला आहे. बँकेकडून ही कारवाई महसूल अधिकारी व एमआयडीसी पोलीसांच्या बंदोबस्तात करण्यात आली आहे, अशी माहिती कॅनरा बँकेचे पुणे येथील मुख्य व्यवस्थापक रजनीशकुमार यांनी दिली आहे.
     कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील नामांकीत उद्योग म्हणून प्रणव अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजची ओळख होती. चाकण म्हणून ओळख असलेल्या या उद्योगामध्ये खाद्यतेल आणि कृषीपूरक उत्पादने घेतली जात होती. या उद्योगासाठी प्रणव अँग्रो इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनाकडून पुणे येथील कॅनरा बँकेसह युनीयन बँक आॅफ इंडीया, युको बँक, बँक आॅफ बडोदा या बँकाकडूनही कर्ज घेण्यात आले होते. ही सर्व कर्जे सुमारे साडेतीनशे कोटीच्या जवळपास असल्याची माहिती कॅनरा बँकेकडून मिळाली.
      या थकीत कर्जामध्ये कॅनरा बँक (१७०.६७ कोटी), युनीयन बँक आॅफ इंडीया (६२.१० कोटी), युको बँक (५२.३६कोटी), बँक आॅफ बडोदा (७२.४४ कोटी) या कर्जांचा समावेश आहे. या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कॅनरा बँकेकडून बुधवारी सायंकाळी ही संयुक्तीक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी कॅनरा बँकेच्या पुणे शाखेच्यावतीने मागील महिन्यात पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली होती.
      त्यानुसार महसूल अधिकारी व एमआयडीसी पोलीसांच्या बंदोबस्तात मालमत्ता सील करून कारवाई करण्यात आली. ही कारवाई कॅनरा बँकेचे पुणे येथील मुख्य व्यवस्थापक रजनीशकुमार यांच्यासह आठ अधिकार्यांच्या पथकाने केली. या कारवाईमध्ये बँकेकडून मशिनरी व जंगम मिळकतीचा ताबा घेण्यात आला आहे. बँकेकडून कंपनीच्या मुख्य गेटलाही सील करण्यात आले आहे. बँकेच्या पथकाकडून संपूर्ण दिवसभर ही कारवाई सुरू होती.  

Post a comment

0 Comments