Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुरळप येथील दोडका व टोमॅटो पीक उद्ध्वस्त, दोन लाखाचे नुकसान

पेठ ( रियाज मुल्ला)   

          मागील पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे कुरळप ता. वाळवा येथील अमोल सूर्यवंशी या शेतकऱ्याच्या 50 गुंठे क्षेत्रातील दोडका व टोमॅटो पीक उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे दोन अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
      कोरोनाच्या महामारी मध्ये गेली सहा महिन्यापासून शेतकऱ्यांची आर्थिक घडी बिघडली आहे. कोरोनाच्या सुरवातीला दोन महिने बाजारपेठा बंद असल्याने कित्तेक  शेतकऱ्यांना आपला भाजीपाला शेतातच कुजवावा लागला. त्याच्या लागवडीचा खर्च ही अंगावर आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले आहे. तर बाजार पेठा सुरु झाल्या मात्र आठवडा बाजार बंद झाला. नंतर एक महिन्यापासून कसे बसे शेतकरी सावरत असताना आता अस्मानी संकट  यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.
        वाळवा तालुक्यातील कुरळप येथील अमोल सूर्यवंशी यांचे कुंडलवाडी रोड लगत असणाऱ्या 30 गुंठे क्षेत्रात दोडका व 20 गुंठ्यात टोमॅटो पीक लावले आहे. यासाठी त्यांना दोडका पिकासाठी ठिबक सिंचन पाईप लाईन, मल्चिंग पेपर, लाकडी दांडकी, तारा यासाठी एक लाख रुपये व टॉमॅटो पिकासाठी पन्नास हजार रुपये खर्च आला आहे. मागील दहा दिवसापासून दोडका पीक सुरु झाले होते. मात्र बुधवारी रात्रभर पडलेल्या मुसळदार पाऊसामुळे ओढ्याचे पाणी शेतात शिरून ठिबक पाईप, दांडकी, मल्चिंग पेपरसह दोडका पीक वाहून गेले असल्याने दोन अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. 
      दोन तीन महिने महागडी औषध व लागवडी घालून काबाड कष्ट करून  जतन केलेले  पीक डोळ्या देखत वाहून जाताना पाहून शेतकऱ्यांना गहिवरून आले होते. तर शासनाने त्वरित पंचनामा करून भरपाई मिळण्याची मागणी होत आहे. सूर्यवंशी मळ्यातील अन्य 12 शेतकऱ्यांची भेंडी टोमॅटो यासारखी पिके पाऊसाने वाहून गेली आहेत. तर पाच दिवसापासून सुरु असलेल्या मुसळदार पाऊसाचे पाणी शेतात शिरून तालुक्यातील 400 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून ग्रामसेवक, तलाठी कृषीसहाय्यक अधिकारी यांच्या मार्फत सर्वे सुरु असून पंचनामा कामकाज सुरु असल्याचे वाळवा तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने यानी सांगितले.

 


 

Post a Comment

0 Comments