Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरात ' खून का बदला खून ', मासे विक्रेत्याच्या खूनाचा छडा लावण्यात यश

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे  )

   इस्लामपूरमध्ये गुरुवार २९ रोजी रात्री  मासे विक्रेत्या तरुणाची झालेली निर्घृण हत्या ही २०१५ साली झालेल्या भावाच्या खुनाच्या सूडाच्या भावनेतूनच झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेतील संशयित मदन संभाजी कदम (रा. किल्ले मच्छींद्रगड) याला अटक झाली असून यातील अर्जुन उर्फ हणमंत उर्फ नाना प्रल्हाद बाबर (तुजारपूर), सुरज संपत गायकवाड (करंजवडे ) व एक अज्ञात असे तिघेजण फरार आहेत.
    इस्लामपूरमध्ये अक्षय तुकाराम भोसले (वय २८ रा. उरुणवाडी ) या मासे विक्रेत्या तरुणाचा येथील मायक्का मंदिरापाठीमागील उरूणवाडी रस्त्यावर गुरुवारी २९ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हा निर्घृण खून झाला. अक्षय भोसले यांचे इस्लामपुरात मासे विक्रीचे दुकान आहे. बुधवारी मदन, अर्जुन व सुरज यांनी त्याच्याकडून कोळंबी उधारीने खरेदी केली होती. त्यानंतर दुसऱ्यादिवशी पुन्हा तेच तिघे मासे खरेदी करायला त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी अक्षयने त्यांच्याकडे बुधवारच्या उधारीची मागणी केली. मात्र, त्या पैशावरून अक्षय आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. मदन व अक्षय दोघे मित्र होते.
         गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादानंतर अक्षय मासे विक्रीचे काम संपवून दुचाकीवरून (एमच १०–डीएच ९५२७) वरून घराकडे निघाला होता. आंबेडकर नाका येथून जाताना अक्षयचा मामा किरण पवेकर यांना फोन लावला होता. मामाशी फोनवर बोलत तो गाडीवरून जाताना माशांची ऑर्डर देत होता. याचवेळी मदन कदम, अर्जुन बाबर, सूरज गायकवाड व एक अज्ञात आशा चौघांनी निर्मनुष्य ठिकाणी गाठून अक्षयवर हल्ला चढवला. तेंव्हा जिवाच्या आकांताने ओरडत तो पळत सुटला. हा सर्व प्रकार अक्षयचा मामा फोनवर ऐकत होता. अक्षयचा मामा घटनास्थळी पोहोचे पर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.
    यातील मदन कदम हा रेकार्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर याअगोदर तीन गुन्हे दाखल आहेत. मासे उधार दिले नाहीत म्हणून मदन व अक्षय याचा वाद झाल्याने तो चिडून होता. त्यानेच हा खून घडवून आणला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अर्जुन, सूरज व एक अज्ञात आशा चौघांनी पूर्वनियोजन करून अगोदरच एका हार्डवेअर च्या दुकानातून कोयता व सूरी विकत आणली होती. अक्षय वर  २/३ दिवस नजर ठेवून त्याला गावाकडे उरूणवाडीला जाताना निर्मनुष्य ठिकाणी गाठून त्याच्यावर हल्ला करत त्याच्या हातावर पोटावर २९  वार करून त्याचा कोतळा बाहेर काढला आणि हा खून करून यातील संशयित मदन, अर्जुन, सूरज व एक अज्ञात असे चौघेजण फरार झाले. यातील मदन याला अटक केली असून तिघेजण अद्याप फरार आहेत. सांगली पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम व अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या सूचनेनुसार व उप विभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख पुढील तपास करत आहेत.
..........................................
दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू
केला होता व्यवसाय-
     अक्षय भोसले हा ठाणे येथे रिक्षा चालवत होता. ठाणे येथेच २०१५ मध्ये अर्जुनचा भाऊ शिवाजी प्रल्हाद बाबर यांचा आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून  खून झाला होता. २०१८ मध्ये अक्षयची त्या खुनातून निर्दोष मुक्तता झाली होती. त्यानंतर गावी येऊन तो भाजीविक्रीचा व्यवसाय करू लागला होता. त्यानंतर मामा पवेकर यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याला मासे विक्रीचे दुकान सुरू करून दिले होते. तसेच मार्च महिन्यातच अक्षयचे मामा पवेकर यांच्या पुतणीसोबत त्याचे लग्न झाले होते. मात्र, दुर्दैवाने त्याची गुरुवारी हत्या झाली.

Post a Comment

0 Comments