इस्लामपूर : स्मशानभूमीच हीच आपली कर्मभूमी, उदरनिर्वाहाचे साधन आहे, या भावनेने दिलीप कुंभार व दिलीप सावंत यांनी स्मशानभूमीचे पूजन करुन महाराष्ट्रातील अनोखा दसरा साजरा केला.
इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
विजयादशमी म्हणजेच दसरा हा हिंदु संस्कृती मधील प्रमुख सण. याच दिवशी सीमोलंघन करुन नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी आपण सज्ज होतो. अर्थातच घरोघरी आपली उपजीविका ज्या साधनसामुग्रीवर चालते त्याचे आज दसर्यानिमित्त पूजन केले जाते. परंतु इस्लामपूर येथील दिलीप कुंभार व दिलीप सावंत यांनी दसऱ्यानिमित्त चक्क स्मशानभूमीचे पूजन करून महाराष्ट्रातील अनोखा दसरा साजरा केला आहे.
दसरा व खंडेनवमीला घर आणि घरातील वाहने किंवा मोठ्या वस्तू हार-फुले घालून मनोभावे पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे पूर्वीपासून चालत आली आहे. त्याचप्रमाणे दिलीप मनोहर सावंत यांचे कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन हे येथे असणारी स्मशानभूमी बनली आहे. कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर आले आणि सगळीकडे जनमाणसांची आर्थिक घडी विस्कटली. हातचे रोजगार गेले, बेकारीची कुऱ्हाड कोसळली, कुटुंबाची फरफट होऊ लागली. हाताला रोजगार मिळेना, कुटुंबाची उपासमार होऊ लागली. बायको पोरं उपाशी राहू लागली. हवालदिल झालेल्या दिलीप सावंत यांना नगरपालिकेने एक ठेका काढला असल्याचे समजले.
कोरोनामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही फार मोठं होतं. कोरोनाने दगावणाऱ्यांची संख्या वाढत होती. मात्र कोरोनाच्या भीतीने दगावलेल्यांच्यावर अंत्यसंस्कार करायला त्यांचे नातेवाईकसुद्धा येत नव्हते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एव्हढी वाढली की प्रशासनसुद्धा अपुरे पडून परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. सगळीकडे व्यवस्था करणे प्रशासनाच्या हातात राहिले नाही. त्याचवेळी नगरपालिका प्रशासनाने कोरोनाने मृत्यू झालेल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी, अंत्यसंस्कार करण्यासाठी ठेका देण्याचे ठरवले.
बेकारीने त्रस्त झालेल्या इस्लामपूरातील दिलीप सावंत यांनी आपल्या काही जोडीदारांना घेऊन हा ठेका भरला. कोरोनाच्या भीतीने अन्य कोणीही ठेका भरला नाही. त्यामुळे त्यांनाच ठेका मिळाला आणि सावंत यांच्यासाठी ही स्मशानभूमीच कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन बनले. खाजगी वाहन चालवून कसेबसे पोट भरणारा दिलीप सावंत पुरता मोडून पडला होता. कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहाजवळ जायलाही नातेवाईक घाबरत ते कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह दिवस-रात्र जागून दहन करण्याचे काम ते करू लागले. हाताला रोजगार मिळाला, त्यांच्या कुटुंबाचा रोजगाराचा प्रश्न सुटला, होणारी उपसमारी-फरफट थांबली व सर्व प्रश्न मार्गी लागले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी प्रमिला माने, अधिकारी अनिकेत हेंद्रे, साहेबराव जाधव व दिलीप कुंभार यांचे सहकार्य दिलीप सावंत यांना मिळत आहे.
.................................
स्मशानभूमीच बनली कर्मभूमी :
कोरोना मुळे जगणे अशक्य झालेल्या काळात ही काम करण्याची संधी मिळाली. ही स्मशानभूमीच हीच आपली कर्मभूमी, उदरनिर्वाहाचे साधन आहे या भावनेने दिलीप कुंभार व दिलीप सावंत यांनी इस्लामपूर येथील कापुसखेड रस्त्यावर असलेल्या या स्मशानभूमीला दैवत मानून पूजन केले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
0 Comments