सांगलीत अप्पर तहसिलदार कार्यालय सुरू होणार

सांगली : अप्पर तहसिलदार कार्यालयातील पदे तातडीने भरावीत या मागणीचे निवेदन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी नुकतेच मुंबईत दिले.

श्री. पृथ्वीराज पाटील यांची माहिती : अप्पर तहसिलदार पद भरले

सांगली, (राजेंद्र काळे)
        सांगलीत अप्पर तहसिलदार कार्यालय सुरू करण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्या आहेत. या ठिकाणचे अप्पर तहसीलदार पद भरण्यात आले आहे, नायब तहसिलदारांसह इतर पदेही लवकरच भरली जातील अशी ग्वाही महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी दिली असल्याचे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
          सांगलीच्या अप्पर तहसीलदार कार्यालयातील पदे भरावीत आणि हे कार्यालय लवकर सुरू करावे यासाठी आपण महसूल मंत्री ना. थोरात यांची नुकतीच मुंबईत भेट घेऊन मी निवेदन सादर केले होते. हे कार्यालय लवकर सुरू व्हावे म्हणून जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनीही शिफारस करून सहकार्य केले होते, असे श्री पाटील यांनी सांगितले.
         राजवाड्यात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे कार्यालय कार्यरत होणार आहे, सांगली शहर, कुपवाड, सांगलीवाडी, हरिपूर, अंकली, इनाम धामणी, बामनोली वानलेसवाडी, बुधगाव, माधवनगर, नांद्रे, बिसूर, कावजी खोतवाडी, वाजेगाव, नावरसवाडी तसेच पश्चिम भागातील काही गावे अशा एकूण ३१ गावांना या कार्यालयाचा लाभ मिळणार आहे. मिरजेला जाणे लांब असल्यामुळे सांगलीत अप्पर तहसीलदार कार्यालय व्हावे अशी त्यांची अनेक वर्षांची मागणी होती, ती या निमित्ताने पूर्ण झाली आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
         अप्पर तहसिलदार, नायब तहसिलदार, एक अव्वल कारकून, चार कारकून, वाहन चालक, शिपाई अशी पदे या ठिकाणी असतील, उर्वरित पदे लवकरच भरू अशी ग्वाही ना. थोरात यांनी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
----------------


Post a comment

0 Comments