Daily Mahasatta

Daily Mahasatta

चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला


मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असं ट्विट ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या ट्विटवरून आता राजकीय क्षेत्रातूवन विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता नितीन राऊत त्यांना टोला लगावल्याचं दिसत आहे.

“नितीन राऊतजी मी आपलं महापॉवरकट बाबतचं ट्वटि वाचलं. तुम्ही म्हणत आहात की, हा घातपात असू शकतो. मी देखील मुख्यमंत्र्यांना कित्येक महिन्यांपासून हेच सांगत आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादीच या सरकारसोबत सतत घातपातच करत आहेत. कधी पोलिसांच्या माध्यमातून, कधी आर्थिक निर्बंधांच्या माध्यमातून तर कधी कोविड व्यवस्थापनाच्या माध्यमातून. कोण जाणे हा जो प्रकार घडला कदाचित तो सुद्धा अशाच पद्धतीचा घातपात असावा”. असं चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याप्रकरणात भाजपानं आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. “कायम डोक्यात जातीय विचारांमुळे अंधार असलेले महाराष्ट्राचे ग्रीडफेल मंत्री नितीन राऊत यांनी परवाची ग्रीडफेल हा घातपात असल्याचा दावा केला आहे. इतक्या मोठ्या घातपाताची पुसटशी कल्पना राज्याच्या गृहखात्याला आली नाही. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामाच दिला पाहिजे.हा घातपात आहे, हे ऊर्जा मंत्र्यांना केव्हा कळालं. मग त्यांनी याची कल्पना गृह विभागाला का दिली नाही? याचाही खुलासा करावा,” असं भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या अगोदर नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटसंबंधी पत्रकारांशी बोलताना मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं साधी बाब नाही, त्यामुळेच आपण घातपाताची शक्यता वर्तवली असल्याचं म्हटलं होतं. ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

“मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं साधी बाब नाही आणि तुम्हीसुद्धा ते समजू नये. म्हणूनच याच्यामध्ये निश्चितच घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं. काही लोक खासकरुन ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टीकोनातून काहीही घडू शकतं. ते पडताळून पाहणं राज्याचं ऊर्जा मंत्री या नात्यानं माझं काम आहे, ते मी करतोय,” असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, त्याचबरोबर मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झालं होतं.

Post a Comment

0 Comments