Daily Mahasatta

Daily Mahasatta

कामेरी येथील डॉक्टरकडून महिलेची फसवणूक, गुन्हा दाखल

: करंजवडे ता. वाळवा येथील घटना

रियाज मुल्ला ( पेठ)
        करंजवडे तालुका वाळवा येथील महिलेची शासकीय आरोग्य विभागात नोकरी देण्याच्या आमिषाने कामेरी येथील डॉक्टरकडून आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात फसवणूक झालेली महिला व तिच्या कुटुंबियांच्या कडून कुरळप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        करंजवडे येथील सौ. भारती विश्वनाथ पवार या महिलेकडून शासकीय आरोग्य विभागात कंपाउंडर या पदावरती नोकरी देण्यासाठी कामेरी ता. वाळवा येथील व सध्या इस्लामपूर येथे राहणाऱ्या डॉ. अमोल महादेव अजमाने व त्याचे वडील डॉ. महादेव शिवलिंग अजमाने या दोघांनी एक लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली आहे. आत्तापर्यंत अजमाने पिता पुत्रा कडून संबंधित महिलेला नोकरी किंवा पैसेही दिलेले नाहीत. त्यामुळे संबंधित महिला व तिचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत आणि मानसिक धक्क्याने त्रस्त झालेले आहेत.
       नोकरीच्या आमिषाने फसवणूक करण्यात आलेल्या महिलेचे पती विश्वनाथ राजाराम पवार यांनी कुरळप पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत असे म्हटले आहे की, माझी पत्नी सौ. भारती पवार हिचे बी. फार्मसी चे शिक्षण पुणे येथे पूर्ण झाले आहे. शिक्षण घेऊन ती घरीच असल्याने व तिचे शिक्षण वाया जाऊ नये या हेतूने आमच्या कुटुंबीयांनी तिच्या नोकरीकरिता प्रयत्न सुरू ठेवले होते.
           यादरम्यान प्रशांत राजाराम भोसले यांच्या माध्यमातून कामेरी येथील डॉ. अमोल महादेव अजमाने व त्याचे वडील डॉ. महादेव शिवलिंग अजमाने यांचा संपर्क झाला. त्यावेळी डॉ. अमोल अजमाने याने तुम्हाला शासकीय आरोग्य विभागात कंपाउंडर या पदाची नोकरी मी लावतो. त्याकरिता एक लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. नोकरी मिळणार असल्याने व त्याची खात्री प्रशांत भोसले यांच्याकडून देण्यात आलेने मी व माझ्या कुटुंबीयांनी डॉ. अजमाने याला एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली.
         दरम्यानच्या काळात माझी पत्नी सौ. भारती पवार हीने शासकीय आरोग्य विभागातील नोकरीसाठी शासनाच्या वेबसाइटवरून आलेल्या जाहिरातीनुसार परीक्षेसाठी अर्ज केला. पत्नी सांगली येथे परीक्षेला बसली. अजमाने याच्या सांगण्यानुसार परीक्षा फक्त नावालाच असणार आहे. बाकीचे माझे मी बघून घेतो. तुम्ही त्वरित पैसे द्या असे सांगितले. त्यावरून मी व माझ्या कुटुंबीयांनी डॉ. अजमाने याला एक लाख रुपये दिले. जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा चिकुर्डे येथून माझ्या खात्यातून डॉ.अजमाने याच्या आयडीबीआय शाखा इस्लामपूर बँकेच्या खात्यामध्ये एक लाख रुपये वर्ग केले आहेत.
डॉ. अजमाने याला आरोग्य विभागातील नोकरी देण्याकरिता २०१७ मध्ये पैसे दिले आहेत. तब्बल तीन वर्ष होऊन देखील अजमाने याच्याकडून नोकरी देण्यात आलेले नाही. त्यानंतर मी व माझ्या कुटुंबीयांनी डॉ. अजमाने याला पैसे परत मागितले. २०१७ सालापासून ते आज पर्यंत तो आज देतो उद्या देतो असे सांगतो आहे. दरम्यानच्या काळात वडील डॉ. महादेव अजमाने यांनी माझ्या मुलाने पैसे दिले नाही तर मी तुम्हाला पैसे देतो अशी वचनचिठ्ठी लिहून दिली आहे. त्यांनीही अद्याप पैसे परत केलेले नाहीत.
         आर्थिक फसवणुकीने सध्या माझी पत्नी मानसिक तणावाखाली असून आमच्या कुटुंबा मध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावरूनच मी मला न्याय मिळावा म्हणून कुरळप पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या नोकरीच्या आमिषाने झालेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास एपीआय श्री.अरविंद काटे यांचे मार्गदर्शनाखाली हेड काॅन्स्टेबल श्री. कोकितकर करीत आहेत.

Post a Comment

0 Comments