Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत अप्पर तहसीलदार कार्यालयाचे शनिवारी उद्‌घाटन

सांगली (प्रतिनिधी)
       मिरज तालुक्‍यासाठी नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या सांगलीतील अप्पर तहसीलदार कार्यालयाचे उद्‌घाटन उद्या शनिवारी (ता. ३१) सकाळी ११ वाजता पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
        जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. यामुळे मिरज तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील 31 गावांना लाभ होणार आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी आमदार होताच सन 2014 च्या नागपूर अधिवेशनात सांगली अप्पर तहसीलदार कार्यालयाचा प्रश्न उपस्थित केला होता. मिरज तालुक्‍याचा विस्तार आणि मिरज पश्‍चिम भागातील नागरिकांना मिरज तहसीलदार कार्यालयात येण्यासाठी होणारा विलंब आदी सविस्तर मुद्दे मांडून आमदार गाडगीळ यांनी सांगलीला अप्पर तहसीलदार कार्यालय तातडीने मंजूर करण्याची मागणी केली होती.
        तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महसूल मंत्री एकनाथ खडसे व माजी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे त्यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावाही केला. आमदार गाडगीळ यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येवून महाराष्ट्र शासनाने सांगली येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास ता. 9 सप्टेंबर 2019 रोजी मान्यता दिली. त्यानंतर माजी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा करून नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयामधील रिक्त पदे शासन निर्णयानुसार मंजूर करून घेतली व राजवाड्यातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरु करण्यात आले आहे. 
     या कार्यालयामुळे मिरज तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील 31 गावांना लाभ होणार असून येथील नागरिकांचे सरकारी कामासाठी मिरजेकडे जाण्याचे हेलपाटे व त्रास वाचणार आहे. या उद्‌घाटन समारंभास जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे तहसीलदार डॉ अर्चना पाटील व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments