Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीचे उपायुक्त राहूल रोकडे यांचा अतिक्रमणावर हातोडा

: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह टीमची कारवाई

सांगली (राजेंद्र काळे)
            सांगली महापालिकेकडून आज दुसऱ्या दिवशीही जोरदारपणे अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह टीमने सांगली रिसाला रोडवर दुसऱ्या दिवशीही  अतिक्रमण मोहीम राबवत 40 हुन अधिक छोटी मोठी अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत.
    सांगली शहरातील प्रमुख मार्गावर व्यापारी , व्यावसायिकांनी आपल्या दुकांनाच्या बाहेर शेड, बोर्ड त्याचप्रमाणे पत्रे मारून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रमुख मार्गावरील रस्ते मोठे असूनसुद्धा या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. याचबरोबर अनेक फुटपाथवर सुद्धा अतिक्रमणे करण्यात आली असल्याने नागरिकांना चालणेही मुश्किल झाले होते. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मुख्य मार्गावरील आणि फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
       त्यानुसार बुधवार पासून उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली  सहायक आयुक्त सहदेव कावडे, अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आणि अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे यांच्या टीमकडून कापडपेठ, मारुती रोड, बालाजी चौक, बसस्थानाक परिसरात बुधवारी अतिक्रमण मोहीम राबवित रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली.
        यानंतर गुरुवारी सकाळपासून रिसाला रोड, हिराभाग कॉर्नर परिसरात अतिक्रमण मोहीम राबवित या मार्गावरील दुतर्फा असणारी अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. यामध्ये बेकायदा उभारलेले शेड, व्यवसायाचे बोर्ड, तसेच लोखंडी बोर्ड पथकाने काढले आहेत. रिसाला रोडवरून सुरू झालेली मोहीम हिराभाग चौकापर्यंत राबविण्यात आली. या मोहिमेमुळे रिसाला रोड अतिक्रमण मुक्त झाला असून रस्त्यावरील अतिक्रमणे निघाल्याने हे रस्ते सुद्धा मोठे दिसत आहेत. याचबरोबर येथील खोकी धारकांना सुद्धा उभारलेले शेड आणि कट्टे सुद्धा अतिक्रमण विभागाने काढले आहेत. या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणिल माने, गणेश माळी,  वैभव कुदळे, किशोर कांबळे, उत्कर्ष व्होवाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत ही मोहीम यशस्वी केली.
...............................
*चौकट*
रस्त्यावरील अतिक्रमणे
खपवून घेणार नाही : आयुक्त कापडणीस

        सांगली मिरज आणि कुपवाड शहरात रस्त्यावर अतिक्रमणे असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे आता ही अतिक्रमणे मनपाकडून काढली जातीलच शिवाय यापुढे एकही अतिक्रमण रस्त्यावर दिसले तर ते खपवून घेतले जाणार नाही ते तातडीने काढले जाईल आणि जे अतिक्रमण करतील त्यांच्यावर प्रसंगी कायदेशीर कारवाईसुद्धा करावी लागेल असा इशारा मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.
...................................
*चौकट*
अतिक्रमण मोहीम सातत्याने
सुरू राहणार : उपायुक्त राहुल रोकडे

        मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणारी अतिक्रमण मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे. सांगली शहर अतिक्रमण मुक्त करूच शिवाय 100 फुटी रोड आणि वखार भाग परिसरात सुद्धा अतिक्रमणावर कारवाई केली जाईल. महापालिकेची कारवाई ही एक दिवसाची नसेल तर ती सातत्याने राबविली जाईल. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक, छोटे विक्रते यांनी रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये आणि केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला आहे.

 रिसाला रोडवरील ४० हून अधिक अतिक्रमण जमीनदोस्त 


 

Post a Comment

0 Comments