अखेर मायकल सापडला...


: अक्षय बोर्हाडे या समाजसेवकांने सोशल मीडियात मायकलचा व्हिडिओ शेअर केला आहे

सांगली (राजेंद्र काळे)

        विटा शहरातील लिंगायत स्मशानभूमीत  सुमारे 20 ते 25 वर्ष मुक्काम ठोकलेला मायकल सहा महिन्यापूर्वी गायब झाला होता. आज हाच मायकल पुणे जिल्ह्यातील खेड येथे समाजसेवक अक्षय बोर्हाडे यांना सापडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर झाला आणि हजारो नेटकर्यांनी आपल्या विट्याचा मायकल सापडल्याचा आनंद सोशल मीडियात व्यक्त केला आहे.

         साधारणपणे सन 1996 -97 साली विटा शहरात एक परप्रांतीय वेडसर तरुण आला होता. दक्षिण भारतातील असल्यामुळे तो काय बोलतो हे शेवट पर्यंत कोणाला समजले नाही. त्यांने कधी भिक्षा मागितली नाही किंवा कोणाला खायला काही मागितले नाही. अगदी अनोळखी व्यक्तीने दिलेले खाद्य पदार्थ तो घेत नसे. खानापूर रस्त्यावरील लिंगायत समाजाची स्मशानभूमी हेच त्याचे आश्रयस्थान होते. शहारातील ठरावीक हाॅटेल समोर जाऊन उभा राहिला की त्याला न मागता खायचे पदार्थ दिले जात. सुमारे 20 -25 वर्षाच्या काळात त्यांने कोणालाही मारहाण केल्याची एकही घटना घडली नाही.त्यामुळे तो सर्वांचा लाडका झाला.

        सुमारे सहा फुट उंची, सडसडीत शरीरयष्टी आणि जटा झाल्यामुळे विटेकरांनी त्याचे नामकरण मायकल जॅक्सनच्या नावावरुन मायकल असे केले. काॅलेजला जाणारे तरुण येता- जाता मायकल..मायकल अशा हाका त्याला हाका मारुन त्याची खोडी काढत. त्यामुळे मायकल या नावानेच तो प्रसिद्ध झाला. जो विट्यात आला, तो विट्याचा झाला तसेच विटा हे बाहेर गावच्या लोकांना धार्जिण आहे, असे म्हंटले जाते. विटा शहरात नोकरी, कामाधंद्यासाठी किंवा व्यापारासाठी आलेले परगावचे आणि परराज्यातील हजारो लोक विटेकर झाले हे आपल्याला माहीत आहे. मात्र एक वेडसर व्यक्ती तब्बल २० ते २५ वर्ष विटा शहरातील स्मशानभूमीत राहून विटेकरांच्या गळ्यातील ताईत बनले होता. सहा महिन्यापूर्वी विटा शहरातून अचानक गायब झालेला हा मायकल आता पुण्यात सापडल्याने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.वेडसर किंवा मतिमंद व्यक्तींना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचवणार्या अक्षय बोर्हाडे या समाजसेवकाने मायकलचा व्हिडिओ शेअर केला आहे. 


Post a comment

0 Comments