बलात्कार प्रकरणातील पोलीस निरीक्षक हसबनीसचा अटकपूर्व जामीन फेटाळला

कडेगाव (सचिन मोहिते) 
          कडेगाव येथील युवतीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस याने केलेला अटकपूर्व जामीनाचा अर्ज सांगली येथील सत्र न्यायाधीश मा. एस. पी. पोळ यांनी फेटाळला. सरकारी वकील ॲड. राजू चौगुले व पीडित महिलेचे वकील ॲड. अमित शिंदे यांनी ही माहीती दिली.
           कडेगाव येथील पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस याने लाॅकडाऊन च्या दरम्यान कराड येथे निघालेल्या पीडित महिलेला अधिकारी असल्याचा गैरफायदा घेत लिफ्ट दिली. पीडित महिला ही एम. पी. एस. सी., यु.पी.एस.सी. चा अभ्यास करते हे समजल्यावर तिला आरोपीची पत्नी मार्गदर्शन करेल असे सांगून पीडीतेला फसवून आपल्या कडेगांव येथील घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला होता. याबद्दल पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर कडेगांव पोलीस ठाण्यात आरोपी विपीन हसबनीस विरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. आरोपीने अटक टाळण्यासाठी सांगली येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
या प्रकरणी बलात्कार पीडीतेचे म्हणणे ऐकून घ्यावे या करिता तिच्या वतीने ॲड. अमित शिंदे यांनी अर्ज केला होता. तसेच जामीन अर्जाला तीव्र विरोध करणारे प्रतिज्ञापत्र पीडीतेने न्यायालयात दाखल केले होते. सदर प्रकरणी दोन्ही बाजीने युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने वस्तुस्थिती पाहून व पीडीतेने दाखल केलेले शपथपत्राची दखल घेवून आरोपी हसबनीस याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याचा आदेश आज केला.
         सरकारी वकील ॲड. राजू चौगुले यांनी जामीन फेटाळण्यासाठी जोरदार युक्तीवाद केला. सरकारच्या वतीने ॲड. राजू चौगुले व फिर्यादीच्या वतीने ॲड. अमित शिंदे यांनी बाजू मांडली. शिवसेना सांगली च्या महिला आघाडी प्रमुख सुनीताताई मोरे तसेच मराठा क्रांती मोर्चा सांगली चे अमोल महाडिक, राहुल पाटील यांनी या प्रकरणी आंदोलन करत आरोपीचा जमीन फेटाळण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत विधानपरिषदेच्या उपसभापती मा. निलमताई गोरे यांनी सदर प्रकरण सीआयडी कडे सोपवण्याची मागणी केली होती.

Post a comment

0 Comments