Daily Mahasatta

Daily Mahasatta

कर्नाटक सरकारने सायफण पध्दतीने दिले जत ला पाणी


आमदार विक्रम सावंत यांची माहिती

: तुबची बबलेश्वर योजनेच्या पाण्याने तिकोंडी तलाव भरला

जत (सोमनिंग कोळी)

   कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी जालगिरी येथून सायफण पध्दतीने जत तालुक्याच्या पूर्व भागातील तिकोंडी साठवण तलाव क्रमांक दोन मध्ये आले असून पूर्ण क्षमतेने हा तलाव भरला आहे .यानंतर भिवर्गी तलावात पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.

       कर्नाटक शासनाला विनंती केल्यानंतर कर्नाटकातील जालगिरी येथून सायफन पद्धतीने पाणी जत तालुक्याच्या पूर्व भागात सोडण्यात आले आहे. भिवर्गी तलावाचे जाँकवेल खुले करण्यात आल्यामुळे या जॅकवेलमधून करजगी , बेळोंडगी ,हळ्ळी, सुसलाद ,सोनलगी येथे शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाणी गेले होते. जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६७ गावे पाण्यापासून वंचित आहेत. या गावांना पाणी देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगून आमदार विक्रम सावंत म्हणाले, उन्हाळ्यात महाराष्ट्र सरकारने कर्नाटकाला सहा टी एम सी पाणी दिले होते त्याच्या बदल्यात पावसाळ्यात कर्नाटक सरकारने आम्हाला दीड ते दोन टीएमसी पाणी दिले तरी जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६७ गावे टंचाई मुक्त होणार आहेत. कोणताही खर्च न करता संपूर्ण भागात सायफन पद्धतीने पाणी जाणार आहे. जत पूर्व भागाला पाणी देण्यासाठी नोव्हेंबर २०२० मध्ये चाचणी घेतली जाणार आहे असा खुलासा त्यांनी यावेळी केला.

     सन २०१९ विधानसभा निवडणुकीत तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी जत पूर्व भागात आले होते .परंतु विरोधकांनी आमची खिल्ली उडवली ,तुबची बबलेश्वर योजनेचे हे पाणी नसून पावसाचे आलेले पाणी आहे असा त्यांनी चुकीचा प्रचार केला होता. परंतु आता सध्या तुबची बबलेश्वर योजनेतून पूर्व भागातील आठ ते दहा गावात पाणी आल्यामुळे त्यांना चपराकच बसली आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

        म्हैशाळ योजनेचे जत  तालुक्याच्या पूर्व भागातील अपूर्ण काम येत्या दोन तिन महिन्यात पूर्ण होईल. सनमडी खालील लवटे वस्ती येथील काम पूर्ण झाल्यानंतर दोड्डनाला ( उटगी )  पर्यंत पाणी जाईल असा आत्मविश्वास व्यक्त करून आमदार सावंत पुढे म्हणाले सोलंनकर चौक जत येथे सर्व सोयींनीयुक्त एसटी बस स्थानक बांधकाम करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रशासकीय पातळीवर निविदा प्रक्रिया अल्पावधीतच सुरू होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वळसंग - सोरडी  - गुड्डापुर व डफळापुर ते आनंदपूर आणि डफळापुर गावातील रस्त्याचे काम निकृष्ट करण्यात आले आहे या कामाची गुणनियंत्रण विभागाच्या वतीने तपासणी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराची नावे काळया यादीत टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे असेही आमदार विक्रम सावंत यांनी यावेळी सांगितले .

 

 

 

Post a Comment

0 Comments