Daily Mahasatta

Daily Mahasatta

ना पीपीई किट, ना आरोग्य विमा, तुटपुंजे मानधन ! तरीही अंगणवाडी सेविका, आशा ताईंचा कोरोनाशी लढा सुरूच


: प्रशासनाने ग्रामपातळीवरील कोरोना योद्धांच्या सुरक्षेसाठी पीपीई कीट, मास्क, फेसशिल्ड देण्याची मागणी

पेठ ता.( रियाज मुल्ला )
        आजच्या कोरोना जागतीक महामारीच्या परिस्थितीचा आरोग्य विभागाला व प्रशासनाला ग्रामपातळीवर तात्काळ माहिती देणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस स्वतःचा जीव धोक्यात घालून घरोघरी आरोग्य तपासणीसाठी सामोरे जात आहेत. घरोघरी प्रत्यक्ष भेट देताना समोरासमोर माहिती रजिस्टरला भरली जाते. या आशा सेविका, अंगणवाडी सेविका नेहमीच कोरोना संकटाची टांगती तलवार डोक्यावर घेऊन आपली सेवा बजावत आहेत. अशातच आरोग्य केंद्राच्या दोन आरोग्य सेविकांना कोरोनाची लागण झाली. परंतु प्रशासन अजूनही  गांभीर्याने दखल घेताना दिसून येत नाही.
   वादळी वाऱ्या प्रमाणे घोंगावत आलेला कोरोना विषाणूने ग्रामीण भागात वाडी-वस्ती पर्यंत पोहोचला आहे. गावागावात, गल्ली गल्लीत शिरकाव करून नागरिकांच्यात दहशत  निर्माण केली आहे. घरोघरी आरोग्य तपासणी साठी प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यासमोर आशा सेविका ,अंगणवाडी सेविका, मदतनीस या सर्वांना सामोरे जावे लागते. मात्र त्यांच्या आरोग्याची काळजी प्रशासन घेताना दिसून येत नाही. किमान विविध संस्था, मंडळ, किंवा दानशूर मंडळीकडून त्यांना पीपीई किट, हातमोजे, मास्क, फेसशील्ड व औषधांची सुविधा लवकरात लवकर मिळावी.
      अर्थार्जनासाठी मरणाच्या दारात जात असल्याने आमचे दुःख आम्हालाच माहीत आहे, काय करायचं असे आशा सेविका ,अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणतात "देवा कोरोनाची ही वाट सुटू दे ,करोना ची गाठ हि लवकर सुटू दे, आमच्यावरील करोना कामाचे संकट टळू दे" अशी आर्त हाक अंतःकरणपूर्वक देणाऱ्या कोरोना योध्याना  प्रशासनाने त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेत त्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात अशी मागणी होत आहे.
.........................................................
चौकट :-
    माझे कुटंब माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत कार्य करणाऱ्या आशा वर्कर असो वा अंगणवाडी सेविका असो किंवा शिक्षक असोत किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे सर्व स्टाफ यांना कोरोणा योद्धा असे आपण सन्मान करतो आणि केलाच पाहिजे. पण या योद्याना प्रशासनामार्फत सुरक्षितता साधने ,आरोग्य सोयी-सुविधा व  विमा संरक्षण योजना अद्याप परिपूर्ण मिळत नाहीत त्या द्याव्यात. आम्हीही सेवा संघाच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न शील आहोत.
              दिग्विजय मोहिते
      सरचिटणीस अखिल भारतीय मराठा सेवा संघ. 


 


 

Post a Comment

0 Comments