आरारा ऽऽऽ रा ऽऽ रा ऽऽऽ भाई का बर्थडे वाजले बारा...


: वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवार आणल्याने गुन्हा दाखल

सांगली (राजेंद्र काळे)
         सांगलीवाडी येथे वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवार घेऊन आल्याने  एका बत्तीस वर्षाचा तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतले आहे. यशवंत सिताराम जाधव वय- 32 रा. हारुगडे प्लॉट, सांगलीवाडी (ता.मिरज) असे या तरुणाचे नाव आहे.
         मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटात खलनायकाचा वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापल्याचे चित्रीकरण दाखवण्यात आले आहे. वाढदिवसाचा हा मुळशी पॅटर्न राज्यातील तरुणांना भलताच आवडल्याचे स्पष्ट झाले आहे. आजपर्यंत अनेक ठिकाणी तलवारीने केक कापण्याचे प्रकार समोर आले आहेत. सांगलीवाडी येथे देखील एका तरुणाने वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवार आणली होती. सदरची तलवार घेऊन हा तरुण सांगलीवाडी मेन चौकात एका बाकड्यावर बसला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली होती.
          सांगलीवाडी येथील मेन चौकात एक तरुण तलवार घेऊन बसला असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून या तरुणाला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे वाढदिवसाचा केक कापण्यासाठी आणलेली एक तलवार मिळाली. त्यानुसार संबंधित तरुण  यशवंत सिताराम जाधव (वय 32) याच्यावर आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्थातच वाढदिवसाचा केक कापण्याचा हा 'मुळशी पॅटर्न ' या तरुणाच्या भलताच अंगलट आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.


 

Post a comment

0 Comments