Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटेकर ' कोव्हीड योद्धांच्या ' कामगिरीची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल

विटा : ग्रामीण रुग्णालयास हाय फ्लो ऑक्सीजन नोझल मशीन आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन भेट देताना विटा बचाव कोरोना समितीचे सदस्य.

सांगली ( राजेंद्र काळे )

        राज्य आणि देशभरात कोरोनामुळे हाहाकार उडाल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली असताना विटा बचाव कोरोना समिती नागरिकांच्या रक्षणासाठी पुढे आली आणि बघता बघता विटा शहरातील रुग्णालयांमध्ये लागणार्‍या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी सुमारे लाखांचा निधी जमा झाला. याच निधीमधून विटा ग्रामीण रुग्णालयास हाय फ्लो ऑक्सीजन नोझल मशीन आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट हे सुमारे दोन लाख 87 हजार रुपयांचे मशीन भेट देण्यात आले.

           गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. लोकांना ऑक्सिजनची सुविधा नाही, उपचारांची सुविधा नाही अशावेळी लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असताना विट्यातील काही सूज्ञ तरुण आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत विटा बचाव कोरोना समिती स्थापन केली आणि या समितीच्या माध्यमातून विटा आणि परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी जणू विडाच उचलला. विटा शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटरला आवश्यक अशी सर्व प्रकारची मदत करण्यासाठी शहरातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला विटा परिसरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

       कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर विटा शहरामध्ये  मध्ये विटा बचाव कोरोना समिती काही दिवसापूर्वी स्थापन झाली. या समितीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते  आणि सामाजिक संघटनांचा समावेश आहे. समितीच्या माध्यमातून विट्यात  28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट असा चार दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला व तो विटेकर नागरिक, व्यापाऱी तसेच प्रशासनाच्या सहकार्याने शंभर टक्के यशस्वी झाला. विटा बचाव कोरोना समितीने जनता कर्फ्यू करत असताना प्रशासन तसेच आरोग्य विभाग व नागरिक यांच्यामध्ये एक दुवा बनण्याचं सूत्र प्रथम पासूनच अवलंबिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विट्यातील असणाऱ्या आरोग्य सुविधांचा विटा ग्रामीण रुग्णालय तसेच ओम श्री हॉस्पिटल त्याचबरोबर इन्स्टिट्यूशनल कोरंटाईन सेंटरचा आढावा घेत त्या ठिकाणी असणारी उपकरणांची कमतरता जाणून घेतली व त्या दृष्टिकोनातून आर्थिक मदत जमा करण्यास सुरुवात केली. 

        7 लाखांचा मदतनिधी जमा...

         खानापूर तालुका दानशूर व्यक्तींचे आगार  आहे.  विट्यातील दानशूर व्यवसायिक तसेच देशभरातील  पसरलेले दानशूर गलाई व्यवसायिकांच्या मदतीचा ओघ सुरू झाला व ठरल्याप्रमाणे कोरोना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी लागणारी ऑक्सिजन यंत्रणा म्हणजेच हाय फ्लो ऑक्सिजन नोजल मशीन व त्याच सोबत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट या साधारणपणे दोन लाख 87 हजार पाचशे रुपयांची यंत्रणा आज विटा ग्रामीण रुग्णालयास सुपूर्द करण्यात आली. आतापर्यंत मदतीचा आकडा सुमारे 7 लाखांपर्यंत पोहचला आहे.

................................................................


विटेकर कोव्हीड योद्धांच्या

कामगिरीची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल

           कोरोनाच्या या भीषण संकटात  विटा कोरोना बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी अहोरात्र धडपड सुरू केली आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, व्यापारी आणि नागरिकांचा समावेश आहे. विटेकरांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आतापर्यंत सुमारे 7 लाखांचा मदतनिधी जमा झाला आहे, आणखी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरूच आहे. विटा बचाव कोरोना समितीच्या योद्धांच्या या  कामगिरीची शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद घेतली जाईल, हे निश्चित.


 

Post a Comment

0 Comments