Daily Mahasatta

Daily Mahasatta

आम. पडळकरांच्या निधीतून तीन अत्याधुनिक अॅम्ब्युलन्स, हजारो रुग्णांचे प्राण वाचणार

:  विटा, आटपाडी, खरसुंडीला मिळणार अत्याधुनिक ऑक्सीजनयुक्त अॅम्ब्युलन्स

सांगली (राजेंद्र काळे)
           खानापूर, आटपाडी तालुक्यात ऑक्सिजनयुक्त अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. आगामी काही दिवसात ही परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. हे ओळखून आ. गोपीचंद पडळकर यांनी विटा, आटपाडी, आणि खरसुंडी या शासकीय  रुग्णालयाना प्रत्येकी एक अशा तीन ऑक्सिजनयुक्त अॅम्ब्युलन्स देण्याचे निश्चित केले आहे.
         सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी तालुक्यात कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे खानापूर तालुक्यात सध्या ५४२ तर आटपाडी तालुक्यात ५७६ इतके रुग्ण आढळून आले आहेत. सध्या दररोज ५० ते ६० रुग्णांची या तालुक्यातून नव्याने भर पडत आहे. खानापूर, आटपाडी तालुक्यातील सर्व दवाखाने फुल्ल झाल्यामुळे रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी विदारक अवस्था आहे. अशावेळी  रुग्णांना अन्य ठिकाणी हलविण्यासाठी किंवा एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेताना ऑक्सिजनयुक्त ऍम्ब्युलन्सची अत्यंत गरज आहे. परंतु विटा ग्रामीण रुग्णालयाला भाड्याने घेतलेली एक ऍम्ब्युलन्स सोडता  खरसुंडी, आटपाडी या भागात ऑक्सिजनयुक्त ॲम्बुलन्स नाही.  त्यामुळे रुग्णांची अवस्था केविलवाणी होत आहे.
         आमदार गोपीचंद पडळकर यांनी रुग्णांची गरज ओळखून विटा, आटपाडी आणि खरसुंडी येथील शासकीय रुग्णालयासाठी सतरा लाख रुपयांची प्रत्येकी एक अशी अत्याधुनिक ॲम्बुलन्स आपल्या स्थानिक विकास निधीतून देण्यात यावी असे पत्र जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांना दिले आहे. लवकरच याबाबतची कार्यवाही पूर्ण होऊन या तिन्ही गावांना अत्याधुनिक अॅम्ब्युलन्स उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून हजारो रुग्णांचे प्राण वाचणार आहेत
...................................
अनेकांना जीवदान मिळणार...
        खानापूर, आटपाडी तालुक्यांना ऑक्सीजन कीटसह अॅम्ब्युलन्स उपलब्ध होणार असल्याने रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.  ज्या रुग्णाना ऑक्सीजनची गरज आहे, अशा रुग्णाच्या घरापर्यंत पोहचून त्यांना तातडीने आरोग्य सेवा देता येणार आहे. या रुग्णवाहिकामुळे अनेकांना जीवदान मिळणार आहे.
         डाॅ. अनिल लोखंडे
         तालुका आरोग्य अधिकारी, खानापूर


 

Post a Comment

0 Comments