ज्यांना वेशी बाहेर अडवले, त्यांनीच दिल्या १५ ऑक्सीजन मशीन

: गलाई बांधवांच्यावतीने खानापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी १५ ऑक्सीजन मशीन वज्रधारी फौंडेशनकडे सुपूर्द करण्यात आल्या.

विटा ( राजेंद्र काळे)
         लाॅकडाऊनच्या काळात परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून कोणीही आपल्या गावात येऊ नये यासाठी ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या बाहेर रस्ते खोदून तसेच रस्त्यावर ती मोठी झाडे पाडून रस्ते बंद केले होते. परराज्यातील गलाई  बांधवांनी गावी न येता व्यवसाय करत असलेल्या राज्यातच थांबावे असे आव्हान देखील करण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि गलाई बांधव यांच्यात काही प्रमाणात कटुता येण्याची भिती होती. मात्र गलाई बांधवांनी आपल्या मायभूमी आणि इथल्या नागरिकां विषयी असलेला जिव्हाळा दाखवत कोरोनाच्या संकटात खानापूर तालुक्यातील लोकांसाठी १५ ऑक्सीजन मशीन सुपूर्द केल्या आहेत.
         सुरुवातीच्या काळात कोरोना  विषयी लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते.  त्यामुळे पर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून येणाऱ्या गलाई बांधव विषयी देखील लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. बाहेरून आलेले लोक आपल्या गावात कोरोनाचा फैलाव करतील या भीतीने अनेक गावाच्या बाहेर जेसीबीने सरी पाडून रस्ते बंद करण्यात आले. तसेच काही ठिकाणी दगड-विटा तसेच लाकडी ओंडके टाकून बाहेरून येणाऱ्या लोकांना प्रवेश बंदी केली होती. त्यामुळे नोकरी, व्यवसायासाठी गाव सोडून गेलेल्या लोकांमध्ये भितीचे वातावरण होते. काही दिवसानंतर या लोकांना शाळेत किंवा घरी कोरंटाईन करुन हा प्रश्न सोडविण्यात आला.
        आता काही महिन्यांपूर्वी ज्या गलाई बांधवांना वेशी बाहेर अडवले होते, तेच गलाई बांधव आपल्या माय पांढरी आणि आपल्या बांधवांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, पॉंडेचेरी येथील  गलाईबांधव ग्रुपच्यावतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल लोखंडे, एपीआय प्रदिप झालटे,  जेष्ठ गलाई बांधव बळवंत भाऊ जगदाळे, संतोष शेठ सुर्यवंशी यांच्या हस्ते पंधरा ऑक्सीजन कॉन्सनट्रेट मशिन वज्रधारी फौंडेशनकडे सोपविण्यात आल्या. पंचफुला मंगलकार्यालय येथे हा सोहळा संपन्न झाला.
       लॉकडाऊनच्या काळात स्वत: चा व्यवसाय अडचणीत असतानाही गलाईबांधव आपल्या मायभूमीच्या मदतीला धावून येत आहेत. कोरोनाच्या काळात लोकांची अडचण होवू नये, आपल्याच बांधवांचे ऑक्सीजन अभावी जीव जावू नयेत यासाठी गलाईबांधव धावून आलेत. त्यांनी आज पंधरा ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर मशिन वज्रधारी फाऊंडेशनचे दत्तकुमार खंडागळे यांच्याकडे सपुर्द केल्या. यापुर्वीही काही गलाईबांधवांनी आपले योगदान दिले आहे. सरकारी हॉस्पिटलला मदत केली आहे.             गलाईबांधव हा या दुष्काळी भागाचा ख-या अर्थाने आधारवड आहे हे नक्की. आज झालोल्या सोहळ्यासाठी कोईमत्तूर, धर्मपुरी, सेलम, मदुराई, कडलूर, पॉंडेचेरी, आरणी, वेल्लोर आदी भागातले गलाईबांधव उपस्थित होते. त्यात यावेळी  धनाजी शेठ शेळके, पांडूरंग शेठ सुर्वे, निवृत्ती शेठ, जयकर शेठ साळूंखे, कोईमत्तूरचे विठ्ठल नारायण पाटील,  संजय शिवाजी लाड, संजय तुकाराम माळी, मीत पाटील, प्रसाद यादव मदुराई येथून राजू भाऊ सुर्वे, आरणीचे विजय गणपतराव पाटील, आरणीचे मराठा गोल्ड & सिल्वर रिफायनरी असोसिएशन चेन्नई व महाराष्ट्र मित्र मंडळ ट्रस्ट चेन्नईच्या वतीने संदिप भिमराव साळुंखे, अंकुश जाधव, सुरज धोंडीराम घाटगे, धर्मपुरी मधून  आनंद शेठ शिंदे, वाय शंकरशेठ, पी शंकरशेठ, मदुराई मधून अरुण (दादा) सूर्यवंशी, विजय (भाऊ) जमदाडे आदी गलाईबांधव उपस्थित होते.  

Post a comment

0 Comments