Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात आतापर्यंत २५ डाॅक्टर, ४० नर्सिंग स्टाफ कोरोना पाॅझीटीव्ह, नागरिकांनो... आतातरी जबाबदारीने वागा !!

विटा : खानापूर तालुका लॅबोरेटरी असोसिएशनच्या कोव्हीड योद्धांची टीम प्रशिक्षण घेऊन कोरोना विरोधात लढण्यासाठी सज्ज झाली आहे.


सांगली (राजेंद्र काळे)
      विटा शहरात कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून गेल्या दोन तीन महिन्यात शहरातील २५ डाॅक्टर आणि ४० नर्सिंग स्टाफ अशा आरोग्य सेवेतील ६५ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. अपूरी कर्मचारी संख्या आणि रात्रंदिवस काम असे असताना देखील हे कोव्हीड योद्धे आपले कर्तव्य ओळखून जीवाची बाजी लावून लढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी  बेजबाबदारपणा सोडून कोरोना मुक्तीच्या या लढ्यात योगदान देणे आवश्यक झाले आहे.
        कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. विटा शहरासह जिल्ह्यात ऑक्सीजन बेड मिळत नसल्याने अनेक रुग्णांचा तडफडून मृत्यू होत आहे. शेकडो डाॅक्टर, नर्स, लॅब टेक्नेशियन कोरोना बाधित होत आहेत. विटा शहरासह तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ८१९ वर पोहचला आहे. सद्या दररोज ६० ते ७० नवीन रुग्णांची तालुक्यात वाढ होत आहे. परिस्थिती आता सर्वांच्या हाताबाहेर गेलेली आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आणि डाॅकटरसह अन्य कर्मचारी असेच बाधित होत राहिले तर अवघ्या काही दिवसांत सर्व सुविधा असताना देखील उपचार करणारे कोणीही मिळणार नाही, हे निश्चित.
          तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची दररोजची सुरु असलेली ६० ते ७० ची वाढ स्थिर राहिली तरी देखील  केवळ महिनाभरात तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ हजार पर्यंत पोहचणार आहे. त्यावेळी कल्पना करता येणार नाही अशी परिस्थिती उद्भवू शकते, आणि रुग्ण संख्या यापेक्षा वाढत गेल्यास विचार न केलेला बरा. त्यामुळे ही परिस्थिती सुधारुन कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी करण्यासाठी प्रत्येक सूज्ञ नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आगामी  महिनाभरात कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, मास्कचा नियमित वापर, सोशल डीस्टनसिंग आणि लक्षणे जाणविल्यास तात्काळ दवाखान्यात जाणे या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
        प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ॠषिकेत शेळके, मुख्याधिकारी अतुल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अनिल लोखंडे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. अविनाश लोखंडे यांच्यासह सर्व विभागातील आरोग्य कर्मचारी, विटा पालिकेचे नगराध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून लोकांची सेवा बजावत आहेत. कोरोनाला हरविण्यासाठी आता नागरिकांनी देखील या योद्धांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी सज्ज व्हावे. अर्थात यासाठी मैदानात येण्याची नव्हे तर घरीच सुरक्षित राहून सहकार्य करण्याची गरज आहे. खानापूर तालुक्यातील सूज्ञ नागरिक आता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोरोनामुक्तीच्या लढ्यात सहभागी होतील हे निश्चित.
......................................

चौकट
आम्ही लढतोय, लढत राहू...
         प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम आहेत. परंतु त्यालाही काही मर्यादा आहेत. लोकांनी बेजाबदाऱ  पणा सोडून पुढील येणाऱ्या महिनाभरात अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण येऊ न देण्याची जबाबदारी लोकांनी सांभाळावी. आम्ही लढतोय आणि आगामी काळात देखील यापेक्षा दुप्पट ताकदीने लढू. नागरिकांनी शक्य तितके घराबाहेर न पडता काळजी घेऊन आम्हाला सहकार्य करावे.

डाॅ. अभिजित निकम
कोव्हीड केअर सेंटर, विटा.


 

Post a Comment

0 Comments